रिकाम्या हाताला दिलं रोजगाराचं साधन, सोलापुरातील श्रमधारी गरजूंच्या आनंदाला उधाण
By Appasaheb.patil | Published: March 9, 2023 04:38 PM2023-03-09T16:38:22+5:302023-03-09T16:38:57+5:30
सध्या शहरात बेरोजगारांची संख्या अधिक आहे.
सोलापूर : उच्च शिक्षण घेऊनही नोकरी मिळेना..उद्योग करण्यासाठी पैसा जवळ नाही..अशा एक ना अनेक विवंचनेत असलेल्या शेकडो गरजू लोकांना रेहबर फाउंडेशन आणि सफा चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने शहरातील शेकडो गरजवंतांना रोजगाराचे साधन मोफत देण्यात आले. या अनोख्या भेटीनं श्रमधारी गरजूंच्या आनंदाला उधाण आलं होतं.
सध्या शहरात बेरोजगारांची संख्या अधिक आहे. जो तो रोजगाराच्या शोधात दारोदार फिरत आहे. अशातच महागाईने त्रस्त झालेली जनता अगदीच निराश होवून जगत असताना रेहबर फाउंडेशन आणि सफा वेलफेअर ॲण्ड चॅरिटेबल ट्रस्ट यांनी तनंजिम हमदर्द इन्सानियत संस्थेच्या मार्गदर्शनाखली सोलापुरातील शेकडो सर्वधर्मिय गरजू लोकांना रोजगार उपलब्ध व्हावे म्हणून त्यांना चार चाकी गाडीसह रोजगाराचे साहित्य मोफत वाटप करण्यात आले. यावेळी जमियते उलमाचे मौलाना इब्राहीम साहब, ॲड. आसीम बांगी, हैदराबाद, बेंगलोरचे धर्मगुरू उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तनंजीमचे जिल्हाध्यक्ष हाफिझ मेहबूब नदाफ, मौलाना रमजान, फारुख शेख, हाफिझ अमन, आसिफ बागबान खलिफा, रईस शेख, सोहेलभाई, मोहयोद्दीन भाई, आसीमभाई , मोईनुद्दीन, साहिल, पटेल, मुजम्मिल, मोहम्मद अली, शकील भाई व अन्य सदस्यांनी परिश्रम घेतले.
लाखो रूपयांचा खर्च
गरजू लोकांना देण्यात आलेली एका हातगाडीची किंमत कमीत कमी २० हजारच्या आसपास असून असे एकूण १० ते २० लाख रूपये खर्चकरून या गाड्या बेरोजगारांना दिल्या. संस्थेने समाजातील गरजू लोकांचे सर्वेक्षण करून हे सर्व साहित्य वाटप केल्याचे सांगितले. प्लास्टिक साहित्य, फ्रुट, व्हेजिटेबल व्यवसाय करण्यासाठी गाडी सोबत पूर्ण वस्तू मोफत देण्यात आले.
समाजामध्ये भाईचारा, अमन, शांती प्रेम, राष्ट्रीय एकात्मता कायम ठेवण्यासाठी आणि रोजगार निर्मितीसाठी या उद्देशाने हा कार्यक्रम घेण्यात आला. भविष्यात आणखीन नवनवीन उपक्रम सामाजिक हितासाठी राबविण्यात येणार आहेत.
- हाफिझ मेहबूब नदाफ, जिल्हाअध्यक्ष, तनंजीम