तापमानाचा पारा पुन्हा चाळीशी पार, मोसमातील सर्वाधिक तापमानाची नोंद
By शीतलकुमार कांबळे | Published: March 25, 2024 07:06 PM2024-03-25T19:06:40+5:302024-03-25T19:07:24+5:30
तापमानाचा पारा आता चांगलाच वर जात असून, सकाळपासूनच उन्हाचा कडाका जाणवू लागला आहे.
सोलापूर : शहराचे तापमानात मागील काही दिवसांपासून वाढ होत आहे. सोमवार २५ मार्च रोजी वाढत जाणाऱ्या तापमानाने चाळीशी पार केली. सोमवारी सोलापूरचे कमाल तापमान हे ४०.६ अंश सेल्सिअसवर इतके होते. यापूर्वी १६ मार्च २०२४ रोजी ४०.२ अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली होती.
तापमानाचा पारा आता चांगलाच वर जात असून, सकाळपासूनच उन्हाचा कडाका जाणवू लागला आहे. येत्या चार-पाच दिवसांमध्ये आणखी २-३ अंश सेल्सिअस तापमानात वाढ होईल, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. गेल्या आठवड्यापासून शहरातील किमान तापमान आणि कमाल तापमानात वाढ होऊ लागली आहे.
सोलापूरकरांना उष्णतेच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. दुपारी दुचाकीवरून जाताना चांगलाच चटका जाणवत आहे. रात्रीच्या किमान तापमानातही वाढ झाली आहे. त्यामुळे रात्री देखील गरम हवा त्रासदायक ठरत आहे. दरम्यान, पुढील ४-५ दिवसांत महाराष्ट्राच्या अंतर्गत भागांमध्ये कमाल तापमानात २-३ अंश सेल्सिअसने हळूहळू वाढ होईल, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.
मागील पाच दिवसातील कमाल तापमान
२१ मार्च - ३७.४
२२ मार्च - ३८.६
२३ मार्च - ३९.७
२४ मार्च - ३९.७
२५ मार्च - ४०.६