लग्नात सापडलेले साडेतीन लाखांचे सोने वृद्ध दाम्पत्याने केले परत!
By रवींद्र देशमुख | Published: January 1, 2024 06:48 PM2024-01-01T18:48:44+5:302024-01-01T19:14:32+5:30
रुमालात बांधून ठेवले होते सोने.
सोलापूर : लग्न सोहळ्यात सापडलेले जवळपास साडेतीन लाखांचे पाच तोळे सोने मूळ मालकास वृद्ध दाम्पत्याने परत केले. वडाळा तालुका उत्तर सोलापूर येथील केवटे व निर्मळे कुटुंबाच्या लग्न समारंभ केंगाव शिवाजीनगर येथील लक्ष्मीतरू गार्डन मंगल कार्यालयामध्ये होता. लग्न समारंभात आलेल्या एका महिलेने रुमालात बांधून ठेवलेले सोने बसलेल्या ठिकाणी विसरून गेल्या. यावेळी रुमालात बांधून ठेवलेल्या गाठोड्याकडे माजी सैनिक अविनाश शंकर कलशेट्टी व कमलबाई कलशेट्टी (राहणार कदेर, तालुका उमरगा, जिल्हा धाराशिव) या वयस्कर दाम्पत्याचे लक्ष गेले. यामध्ये काय आहे म्हणून त्याने ते उकलून पाहिले तर त्याच्यामध्ये साखळीचे गंठण, कानातील फुले व नाकातील नथ असा एकूण साडेतीन लाख रुपयांचा असलेला पाच तोळे सोन्याचा ऐवज त्यामध्ये निघाला.
रुमालामधील निघालेले सोने जसेच्या तसे प्रामाणिकपणा दाखवत वधू मुलीच्या आईकडे सुपुर्द केले. या कार्यात पाहुणे म्हणून आलेले परमेश्वर साखरे यांनी स्पीकरवरून आलाउन्सिंग केले. लग्न कार्यामध्ये कोणाचे तरी सोने सापडले आहे. ज्याचे असेल त्याने ओळख पटवून देऊन सोने घेऊन जावे असे पुकारले. ज्याचे सोने होते त्या व्यक्तीने काय-काय आहे याची ओळख पटवून द्यावी आणि आपले सोने घेऊन जावे असे सांगितले. यावेळी नववधू-वर यांच्या साक्षीने सापडलेले सोने मूळ मालकांच्या ताब्यात देण्यात आले.