जातो माघारी पंढरीनाथा, तुझे दर्शन झाले आता... म्हणत मानाच्या पालख्यांचा परतीचा प्रवास सुरू!
By Appasaheb.patil | Published: July 22, 2024 01:41 PM2024-07-22T13:41:02+5:302024-07-22T13:41:41+5:30
संतांच्या दिंड्या, पालख्या विठ्ठलनामाचा गजर करीत परतीच्या प्रवासाला लागल्या आहेत.
आप्पासाहेब पाटील, सोलापूर : जातो माघारी पंढरीनाथा। तुझे दर्शन झाले आता ।। म्हणत जड अंत:करणाने संताच्या पालख्यांनी व वारकऱ्यांनी परतीचा प्रवास सुरु केला. गोपाळकाला केल्यानंतर श्री विठ्ठलाचे दर्शन घेऊन मानाच्या पालख्यांनी परतीचा प्रवास सुरु केला. पहाटेपासूनच एकामागोमाग एक अशा विविध सुमारे ४०० संतांच्या दिंड्या, पालख्या विठ्ठलनामाचा गजर करीत परतीच्या प्रवासाला लागल्या आहेत.
दरम्यान, आषाढी वारीनंतर आता पंढरपूर शहरातील भाविकांची गर्दी कमी कमी होत आहे. विठ्ठलाचे दर्शन घेऊन धन्य झालेले भाविकांनी परतीचा मार्गावर आहेत. कोणी रेल्वे तर कोणी एसटी, खासगी बसेसने प्रवास करीत आहेत. याशिवाय मानाच्या पालख्यासह संत सोपानकाका, संत मुक्ताबाई, संत नामदेव महाराज, संत गोरोबा, संत एकनाथ महाराज, संत निवृत्तीनाथ महाराज, संत निळोबाराय, चांगावटेश्वर देवस्थान यांच्यासह अन्य संतांच्या पालख्यांचे व दिड्यांचे परतीच्या मार्गावर आहेत.
गोपाळकाला झाल्यानंतर सर्व मानाच्या पालख्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दाखल झाल्या व सर्व संताच्या पादुका विठ्ठल दर्शनासाठी नेण्यात आल्या. यावेळी देवाची आणि संताची अनुपम भेट घडवून आणण्यात आली. श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेचे दर्शन घेतल्यावर हा संतदेव भेटीचा सोहळा पार पडला. यानंतर पालख्या परतीच्या मार्गावर रवाना झाल्या.