प्रवाशांना लागल्या घामाच्या धारा, स्थानकात गर्दीने येईना वारा
By रूपेश हेळवे | Published: May 6, 2024 09:23 PM2024-05-06T21:23:26+5:302024-05-06T21:23:37+5:30
गर्दीने प्रवाशांना एसटीची वाट पाहत घाम सुटल्याचे पहायला मिळत होते.
सोलापूर : आज मंगळवारी सोलापूर आणि माढा लोकसभा मतदार संघात मतदान होणार आहे. याच्या कामकाजासाठी राज्य परिवहन महामंडळ सोलापूर विभागाच्या जवळपास पन्नास टक्के गाड्या नियोजनासाठी नेण्यात आले आहेत. यामुळे सोलापूर विभागातील जवळपास सगळ्याच स्थानकात प्रवाशांची गर्दी होती. यामुळे गर्दीने प्रवाशांना एसटीची वाट पाहत घाम सुटल्याचे पहायला मिळत होते.
राज्य परिवहन एसटी महामंडळातील सोलापूर विभागात सातशे गाड्या आहेत. यातील जवळपास साडेतीनशे गाड्या या निवडणुकीच्या कामासाठी वापरण्यात येत आहेत. यामुळे जवळपास सगळ्याच गाड्या ७० टक्के गाड्या रद्द झाल्याचे चित्र पहायला मिळाले. यामुळे चौकशी केंद्रावर प्रवाशांची गर्दी पहायला मिळाली. काही वेळा तर प्रवाशांचे आणि तेथील कर्मचार्यांचे वाद झाल्याचे चित्र ही पहायला मिळाले.
यामुळे एखादी जरी गाडी स्थानकात आल्यानंतर दरवाजा उघडण्याच्या आगोदरच त्या गाडीच्या दरवाज्यासमोर शेकडो प्रवाशी गर्दी करून थांबलेले पहायला मिळाले. यामुळे वृध्द, महिला यांची मोठी अडचण झाल्याचे पहायला मिळाले. अनेक प्रवाशांनी या पूर्वीच गाड्यांचे तिकीट काढले होते. पण असे असूनही अनेक गाड्या रद्द झाल्याचे प्रवाशांना सांगण्यात आले. यामुळे प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागले.