कर्नाटकच्या जनतेने भाजपाला हाकलून दिले; सुशीलकुमार शिंदेंची प्रतिक्रिया
By Appasaheb.patil | Published: May 14, 2023 04:15 PM2023-05-14T16:15:36+5:302023-05-14T16:19:25+5:30
काँग्रेस पक्षाने कर्नाटक राज्यात एकहाती सत्ता मिळवली. आमदार प्रणिती शिंदे यांच्यावर पक्षाने दावनगिरी या भागाची जबाबदारी दिली होती, त्याठिकाणी ८ पैकी ६ जागा काँग्रेस पक्षाने जिंकल्या आहेत.
सोलापूर : काँग्रेसचा चेहरा सर्वधर्म समभावचा आहे, आम्हाला १०५ जागांची अपेक्षा होती मात्र १३५ जागा निवडून देऊन कर्नाटकच्या जनतेने भाजपला हाकलून लावले आहे. कर्नाटकात हुकुमशाही चालली नाही आता देशातही परिवर्तन अटळ असल्याची प्रतिक्रिया माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी कर्नाटकमधील काँग्रेसने मिळविलेल्या विजयानंतर आज सोलापुरात दिली.
काँग्रेस पक्षाने कर्नाटक राज्यात एकहाती सत्ता मिळवली. आमदार प्रणिती शिंदे यांच्यावर पक्षाने दावनगिरी या भागाची जबाबदारी दिली होती, त्याठिकाणी ८ पैकी ६ जागा काँग्रेस पक्षाने जिंकल्या आहेत. त्या निमित्ताने सोलापुरात रविवारी सोलापुर शहर काँगेस कमिटीच्या वतीने शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्या नेतृत्वाखाली जनवात्सल्य निवासस्थानासमोर जोरदार जल्लोष करण्यात आला, फटाक्याची आतिषबाजी करत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे व आमदार प्रणिती शिंदे यांचा मोठा हार घालून सत्कार करण्यात आला.
याचवेळी बोलताना प्रणिती शिंदे म्हणाल्या, राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा हा विजय आहे, त्यांची यात्रा ज्या १४ जिल्ह्यातून गेली तिथे वन साईड काँग्रेसने विजय मिळवला आहे. कर्नाटकात जनतेने दाखवून दिले की काँग्रेसच किंग आहे, काँग्रेसला एकहाती सत्ता दिल्याबद्दल मी संपूर्ण जनतेचे आभार मानते, महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचाराच्या विरोधातला हा विजय असल्याचेही प्रणिती शिंदे म्हणाल्या.