केंद्राचे प्लास्टिक बंदी पथक सोलापुरात आले; दोन दिवसांत १७० किलोच्या बॅगा केल्या जप्त
By Appasaheb.patil | Published: November 24, 2022 07:47 PM2022-11-24T19:47:44+5:302022-11-24T19:48:47+5:30
केंद्राचे प्लास्टिक बंदी पथक सोलापुरात आले असून दोन दिवसांत १७० किलोच्या बॅगा केल्या जप्त केल्या आहेत.
सोलापूर : प्लास्टिक बंदीची काटेकोरपणे अंमलबजावणी होत आहे की नाही याबाबतची पाहणी करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाचे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे पथक दोन दिवस सोलापूर दौऱ्यावर होते. या पथकाने शहरातील दुकाने, बाजारपेठा, भाजी मार्केटची अचानक पाहणी केली. या पाहणीत या पथकाने १७० किलोचे प्लास्टिक जप्त करून १ लाख २८ हजारांचा दंड ठोठावला.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्याकडील प्राप्त निर्देशानुसार सोलापूर महानगरपालिका परिसरात १ जुलै २००२ पासून सिंगल युज प्लास्टिक बंदी घालण्यात आली आहे. त्याची दैनंदिन आरोग्य निरीक्षक यांच्या माध्यमातून सर्व प्रभागात प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने २१ नोव्हेंबर ते २२ नोव्हेंबर २०२२ रोजी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्लास्टिक बंदी पथक पाहणीकरिता शहरात दाखल झाले असता घनकचरा व्यवस्थापन विभाग, पर्यावरण विभाग, सोमपा व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या साहाय्याने शहरातील मुख्य बाजारपेठा, भाजी मार्केट, फ्लॉवर मार्केट, होलसेल विक्रेते व प्लास्टिक कारखान्याची पाहणी करण्यात आली असता या पथकाकडून वापरण्यास बंदी असलेले एकूण १७० किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले असून १ लाख २८ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. यावेळी केंद्रीय पथकातील लोखंडे, महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे पाटील, मनपाचे पर्यावरण व्यवस्थापक स्वप्निल सोलनकर, मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार आदी उपस्थित होते.
प्लास्टिक वापराल तर खबरदार...
सोलापूर महानगरपालिकेच्या उपायुक्त यांनी शहरातील सर्व नागरिकांना आवाहन केले असून नागरिकांनी व व्यावसायिकांनी आपल्या दैनंदिन जीवनात शासनाने बंदी घातलेल्या प्लास्टिकचा वापर करणे थांबवून कापडी पिशवीचा वापर करावा. अन्यथा मोठ्या कारवाईला सामोरे जाल अशी तंबी महापालिकेच्यावतीने देण्यात आली.