नो पार्किंगमधील उचललेल्या गाडीची माहिती पाहून पोलिस ही झाले थक्क
By रूपेश हेळवे | Published: June 8, 2023 05:09 PM2023-06-08T17:09:34+5:302023-06-08T17:12:02+5:30
याबाबत पोलीस कॉन्स्टेबल सिद्रामप्पा वीरभद्रप्पा स्वामी ( नेमणूक शहर वाहतूक शाखा, दक्षिण विभाग ) यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
सोलापूर : नो पार्किंग मधून वाहतूक शाखेने एक दुचाकी उचलली. यानंतर दंड भरण्यासाठी मुळ मालकाला बोलवण्यानंतर ज्या गाडीवर कारवाई करण्यात आली होती, त्या गाडीचे नंबरच बनावट असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. शिवाय ती गाडी आरटीओकडे रजिस्ट्रेशन न करताच दोघांनी वापरली. त्यानंतर मनानेच त्यावर नंबर टाकल्याची माहिती तपासात उघड झाली.
याबाबत पोलीस कॉन्स्टेबल सिद्रामप्पा वीरभद्रप्पा स्वामी ( नेमणूक शहर वाहतूक शाखा, दक्षिण विभाग ) यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून सैपन सदाकत कुरेशी (वय २२, रा. बेगम पेठ) व आशितोष रामकृष्ण दंडी (रा. सोलापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
आरोपी दंडी याने २०१८ मध्ये दुचाकी घेतली होती. त्या दुचाकीची नोंदणी त्याने आरटीओ कार्यालयाकडे केलेली नव्हती. त्यानंतर २ वर्षाने त्या दुचाकीचा आरोपी सैपन कुरेशी याच्यासोबत व्यवहार झाला. त्यानंतर आरोपी कुरेशी याने बनावट नंबर प्लेट लावून ती दुचाकी वापरत होता. काही दिवसापूर्वी ती दुचाकी एका नो पार्किंग मधून वाहतूक शाखेने उचलली. त्यानंतर या घटनेचा उलगडा झाला. या प्रकरणी वरील दोन्ही आरोपींवर गुन्हा दाखल झाला आहे. यात दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यांना दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विष्णू गायकवाड करीत आहेत.