नवरा बायकोचं भांडण सोडवणाऱ्या पोलिसास धक्काबुक्की; ठोसा मारला
By विलास जळकोटकर | Published: January 3, 2024 08:24 PM2024-01-03T20:24:41+5:302024-01-03T20:24:54+5:30
शासकीय कामात अडथळा : चौकीचा दरवाजा तोडणाऱ्या तरुणास अटक.
सोलापूर : पती-पत्नीचे भांडण सोडविण्यासाठी मध्ये पडलेल्या पोलिस हवालदारास ‘नवरा-बायकोचे भांडण आहे, तू मध्ये पडू नको’ म्हणत अंगावर धावून येत गणवेशाची गच्ची पकडून डोळ्यावर ठोसा मारला’ चौकीत नेताना चौकीचा दरवाजाही तोडला. ही घटना दुपारी १२:४० च्या दरम्यान, घरकुल पोलीस चौकीच्या मागे महापालिकेच्या दवाखाना परिसरात घडली. गणेश हणमंतू काकडे (वय २९, रा. ढोक बाभुळगाव, ता. मोहोळ) याच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याबद्दल गुन्हा नोंदला असून, त्याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस हवालदार श्रीधर नागनाथ गायकवाड (एमआयडीसी पोलीस ठाणे, सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, दुपारी १:४० च्या सुमारास यातील आरोपीची पत्नी सोलापुरातील महापालिकेच्या रुग्णालयात आरोग्यसेविका म्हणून काम करते. त्या दोघांमध्ये कौटुंबिक कारणातून वाद सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. मंगळवारी २ जानेवारीला दुपारी पावणेएकच्या सुमारास फिर्यादी गायकवाड यांना महापालिकेच्या रुग्णालयात आरोपी गणेश हा पत्नी सुषमा यांना मारहाण करत असल्याची माहिती मिळाली. त्यावरून फिर्यादी आणि पोलिस अंमलदार असे दोघे तेथे गेले.
दोघांनी मिळून आरोपी आणि त्याच्या पत्नी यांच्यातील वाद सोडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपी गणेशने नवरा-बायकोच्या भांडणांमध्ये, तू मध्ये येऊ नकोस म्हणत तो फिर्यादीच्या अंगावर धावून गेला.
त्याने फिर्यादीची गच्ची पकडून त्यांच्या डोळ्याजवळ ठोसा मारला. या झटापटीत फिर्यादीच्या गणवेशाचे बटण तुटले, त्यांचा शर्टही फाटला. यानंतर फिर्यादी आणि सोबतच्या अंमलदाराने आरोपीस घरकुल पोलिस चौकीत नेले. तो कोणाचे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याचा गोंधळ सुरूच होता. त्यादरम्यान घरकुल पोलिस चौकीच्या दरवाजाला लाथ मारून आरोपीने दरवाजा तोडला. या प्रकरणी सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी आरोपी गणेश काकडे विरुद्ध गुन्हा नोंदला आहे. त्यानंतर रात्री त्याला अटक करण्यात आली. या प्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक कुकडे तपास करत आहेत.