सोन्याचा दर चक्क सातशेनं उतरला; पाटल्या नाही, पण नथणी मिळणार
By काशिनाथ वाघमारे | Published: March 21, 2023 06:36 PM2023-03-21T18:36:33+5:302023-03-21T18:37:01+5:30
सोलापूरात व्यापारी आशावादी : चांदीचा दर मात्र राहिला ‘जैसे थे’
काशिनाथ वाघमारे
सोलापूर : साडेतीन मुहूर्तापैकी गुढीपाडवा हा एक मुहूर्त म्हणून पाहिला जातो. या मुहूर्तावर दागिन्यांचा दर साडेचार हजारांनी वाढलेला असला तरी पूर्वसंध्येला ७०० रुपयांची घसरण झाली असून तो आता ५९,३०० रूपये तोळा झाला आहे. सोलापूरकरांनी आनंद लुटायाचा ठरवलं आहे. त्यामुळे बाजारपेठही लक्ष्मीहार, गंठण, बाजूबंद याने सजली आहे. काही गृहिणींनी पाटल्या नाही तर नथ घेऊन आनंद घेण्याची तयारी केली आहे.
सराफ बाजारात मागील काही दिवसांपासून खरेदीचा वेग मंदावत गेला आहे. मागील आठ दिवसात सोने दरात साडेचार हजार रुपयांनी वाढ झाली आहे. पूर्वसंध्येला ७०० रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे काही ग्राहक तयार दागिन्यांकडे आणि प्युअर दागिन्यांकडे वळाले आहेत. सध्या बाजारात महिलांसाठी लाँग गंठण, लक्ष्मी हार, शॉर्ट गंठण, फॅन्सी टॉप्स, कांचन, लेडीज रिंग, बिल्वर, लॉकेट, बाजूबंद अशी अनेक दागिन्यांची व्हरायटी उपलब्ध झाली आहे.