दुचाकी अन चारचाकी ‘स्पेअर पार्टस्’ च्या किमती तीस टक्क्यांनी महागल्या
By दिपक दुपारगुडे | Updated: May 2, 2023 13:52 IST2023-05-02T13:52:28+5:302023-05-02T13:52:49+5:30
इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढला आहे. परिणामी सर्व सुट्या भागांच्या किमतीवर त्याचा परिणाम झाला आहे. हा खर्च अंतिमत: ग्राहकांवरच पडत आहे.

दुचाकी अन चारचाकी ‘स्पेअर पार्टस्’ च्या किमती तीस टक्क्यांनी महागल्या
सोलापूर : वाहनांचे बहुतांश सुटे भाग लोखंड, स्टीलपासून तयार होतात दोन्हीच्या किमती वर्षभरात ४० रुपयांवरून ६५ रुपयांवर गेल्या आहेत. तसेच इंधन दरवाढ, वाहतुकीचा खर्च, लेबर कॉस्ट या सर्वच घटकांच्या किमती वाढल्यामुळे दुचाकी, चारचाकी वाहनांसाठी लागणाऱ्या सर्व सुट्या भागांच्या किमतीत ३० ते ४० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. कार व दुचाकी वाहनांचे सुटे भागाच्या दरात वाढ झाल्याने दुचाकीची 'रिपेअरिंग' करणे आवाक्याबाहेर झाले आहे. इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढला आहे. परिणामी सर्व सुट्या भागांच्या किमतीवर त्याचा परिणाम झाला आहे. हा खर्च अंतिमत: ग्राहकांवरच पडत आहे.
पूर्वी गाडीचे क्लचप्लेट २४० रुपयाला मिळणारी आता तीच ४८० रुपयांना मिळत आहे. दुचाकीच्या इंजिन ऑईलमध्ये ४० ते ५० रुपयांची वाढ झालेली आहे. १७० ते १८० रुपयांत मिळणारे ऑइल २३० ते २५० रुपये प्रतिलीटरवर गेले आहे. दुचाकी वाहनांच्या टायरमध्ये गुणवत्तेनुसार किमती वाढल्या आहेत. स्प्लेंडरचा मागचा टायर पूर्वी १४६० रुपयाचा होता तो आता १७८० रुपये तर ट्यूब मध्ये देखील ५० ते ६० रुपयांची वाढ झाली असल्याची विक्रेत्यांनी सांगितले.
सुट्या भागांची विक्रीही घटली
सुटे भाग महागल्यामुळे वाहनधारकांच्या खिशाला भुर्दंड बसत आहे. परिणामी, खूपच गरज असेल तरच वाहनांना नवीन सुटे भाग टाकले जात आहेत. त्यामुळे स्पेअर पार्ट विक्रेत्यांच्या व्यवसायातही ३० ते ४० टक्क्यांची घट झाली आहे. या व्यवसायावर अवलंबून असलेले अर्थचक्रही त्यामुळे कोलमडले आहे.