मोठी बातमी! थकबाकीपोटी जप्त मालमत्ता महापालिकेच्या नावावर होणार
By Appasaheb.patil | Published: December 15, 2022 12:32 PM2022-12-15T12:32:35+5:302022-12-15T12:33:14+5:30
अभय योजनेचा आज शेवटचा दिवस; वसुली व जप्तीची कारवाईचा वेग वाढला
सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेकडून सध्या मालमत्ता कर थकबाकीदारांवर जप्तीची कारवाई करण्यात येत आहे. मागील सात दिवसात ६ कोटी ७२ लाख रकमेसाठी ९ थकबाकीदारांच्या मालमत्ता सील करण्यात आल्या आहेत. थकबाकीची रक्कम पूर्णपणे भरल्याशिवाय सील काढले जाणार नाही, थकबाकीची रक्कम न भरल्यास संबंधितांची प्रॉपर्टीज् महापालिकेच्या नावावर करण्याची कार्यवाही सुरू करण्यात येईल, असा इशारा उपायुक्त विद्या पोळ यांनी दिला आहे.
महापालिकेच्या कर विभागाने पेठनिहाय, विभागनिहाय मोठ्या थकबाकीदारांची नावे काढली. त्यांच्यावर जप्तीची कारवाई सुरू आहे. मागील आठ दिवसात ७ कोटी ५० लाख रुपयांची वसुली केली आहेत. यात कारवाईसाठी गेल्यावर व काहींनी ऑनलाइन स्वरूपात जमा केलेली रक्कम आहे. आयुक्त शीतल तेली-उगले यांच्या आदेशानुसार शहरातील मोठ्या थकबाकीदारावर जप्तीची कारवाई करण्यात येत आहे. यासाठी कर संकलन विभागाने पाच पथके तैनात केली आहेत. कारवाईच्या भीतीने बहुतांश थकबाकीदार कर भरीत आहेत, मात्र काही बडे थकबाकीदार अद्यापही कर भरण्यास टाळाटाळ करीत असल्याचे दिसून येत असल्याने महापालिकेने आता थकबाकीदाराविरोधात कडक पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. सुरुवातीला मोठ्या थकबाकीदाराविरोधात कारवाई सुरू केली, मात्र आता १५ डिसेंबर २०२२ नंतर सरसकट वसुली व जप्तीची कारवाई करण्यात येणार असल्याचेही विद्या पोळ यांनी सांगितले.
अभय योजनेचा आज शेवटचा दिवस
८० टक्के शास्ती माफ होणारी अभय योजनेला आयुक्तांनी मुदतवाढ दिली होती. मात्र त्याचा लाभ सोलापूरकरांनी घेतला नाही. दरम्यान, आज या अभय योजनेचा शेवटचा दिवस असून सोलापूरकरांनी थकीत मालमत्ता भरून महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन कर संकलन विभागाचे अधीक्षक गाडेकर यांनी केले आहे.