महापालिकेच्या नाेकर भरती परीक्षेचा निकाल आठ दिवसांत जाहीर हाेणार; मनपा आयुक्तांची माहिती
By राकेश कदम | Updated: February 29, 2024 18:53 IST2024-02-29T18:52:37+5:302024-02-29T18:53:20+5:30
आर्थिक देवाणघेवाणीपासून सावध राहण्याचा सल्ला

महापालिकेच्या नाेकर भरती परीक्षेचा निकाल आठ दिवसांत जाहीर हाेणार; मनपा आयुक्तांची माहिती
साेलापूर : महापालिकेने विविध ३१ संवर्गातील ३०२ पदांसाठी घेतलेल्या पदभरती परीक्षेचा निकाल आठ दिवसांत जाहीर हाेईल. गुणवत्ता यादीनुसारच थेट पदभरती हाेणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी आर्थिक देवाण-घेवाणीला बळी पडू नये, असे आवाहन महापालिका आयुक्त शितल तेली उगले यांनी गुरुवारी केले.
महापालिकेच्या ३०२ पदांची भरती टीसीएस कंपनीमार्फत सुरू आहे. यासाठी १५ ते १७ फेब्रुवारी या कालावधीत परीक्षा घेण्यात आली. टीसीएसकडून परीक्षांर्थींच्या गुणानुसार आणि प्रवर्गानुसार गुणवत्ता यादी तयार हाेत आहे. ही सर्व प्रक्रिया ऑनलाइन आहे. सर्व अनुषंगिक प्रक्रिया ही केवळ आणि केवळ गुणवत्तेच्या आधारावरच होणार आहे. नेमणूक होणेबाबत कोणत्याही व्यक्ती शी आर्थिक अथवा इतर व्यवहार करू नयेत. कुणाची अशाप्रकारे फसवणूक झाल्यास त्यास मनपा जबाबदार असणार नाही. आर्थिक देवाण-घेवाण करणारी मंडळींची नावे प्रशासनाला कळवावी. प्रशासन या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करेल. परंतु, अशा मंडळींच्या नादाला लागू आपले आर्थिक नुकसान करून घेउ नये , असे आवाहन आयुक्तांनी केले.