सेवानिवृत्त डीवायएसपीने चक्क आपल्या वडिलांच्या कपाळावर रोखले रिव्हॉल्वर
By दिपक दुपारगुडे | Published: December 20, 2023 07:27 PM2023-12-20T19:27:42+5:302023-12-20T19:27:56+5:30
पुढील तपास करमाळा पोलिस करीत आहेत.
सोलापूर: कोर्टाचा दावा दाखल असताना ऊस का तोडतो, असे विचारण्यास गेले असता सेवानिवृत्त डीआयएसपीने आपल्या वडिलांना मारहाण करून कपाळाला रिव्हॉल्वर लावून तुला जीवे मारतो व पुन्हा शेतात यायचे नाही, अशी धमकी दिल्याप्रकरणी सेवानिवृत्त पोलिस अधिकाऱ्यासह चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार केतुर नं.२ (ता. करमाळा) येथे १८ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता घडला आहे.
यावेळी सेवानिवृत्त डीवायएसपी मालोजी खाटमोडे, देविदास कोकणे, तानाजी पाठक (सर्व रा. केतुर) व दादासाहेब रणदिवे (रा. उंदरगाव ता. करमाळा) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. तर माधवराव तुळशीराम खाटमोडे (वय ८५, केतुर नं. २) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, माधवराव खाटमोडे यांचा सेवानिवृत्त असलेल्या थोरल्या मुलासोबत शेतीच्या वाटपावरून वाद आहे. याप्रकरणी कोर्टात दोन दावे चालू आहेत.
१८ डिसेंबर रोजी दुपारी एक वाजता माधवराव खाटमोडे हे व मुलगा लखोजी असे (दोघे केतुर नं १) येथील शेतात गेले असता त्यावेळी थोरला मुलगा मालोजी खाटमोडे हा कोर्टात दावा असलेल्या शेतात कारखान्याचे हार्वेस्टर मशीन आणून ऊस तोडण्याचे काम करत होते. त्यावेळी सामायिक शेतीचे अजून वाटप झालेले नसताना व या शेतीसंदर्भात कोर्टात दावा चालू असताना तू ऊस का तोडतो असे म्हणून मालोजीने वडिलांनाच उचलून आपटले व नंतर लाथाबुक्क्याने मारहाण केली व स्वतःजवळ असलेले रिव्हॉल्वर काढून कपाळाला लावले व जीवे मारतो म्हणून धमकी दिली.
यावेळी डाव्या हाताने रिव्हॉल्वर बाजूला ढकलले. त्यावेळी माधवराव यांच्या जुन्या जखमेवर पुन्हा जखम होऊन नख उचकटले. यावेळी शिवीगाळ सुरू असताना धाकटा मुलगा लखोजी सोडवण्यासाठी आला असता त्याला देखील मारहाण केली. यावेळी लखोजी यांच्या शेतात काम करणारे देविदास कोकणे, तानाजी पाठक व दादासाहेब रंदवे यांनी लखोजी खाटमोडेला पकडले होते. यानंतर ऊसतोडणीसाठी आलेल्या हार्वेस्टरच्या कामगारांनी भांडणे सोडवण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. यावरून पुढील तपास करमाळा पोलिस करीत आहेत.