शाळा न्यायाधिकरण सोलापुरातच राहणार; बंद करण्याच्या निर्णयाला शिक्षणमंत्र्यांची स्थगिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2022 04:26 PM2022-06-03T16:26:48+5:302022-06-03T16:26:51+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकिंग
सोलापूर : येथील शाळा न्यायाधिकरण बंद करण्याच्या शासन निर्णयाला राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांनी स्थगिती दिल्याची माहिती आ. प्रणिती शिंदे यांनी प्रसिद्धिपत्रकान्वये दिली आहे. सोलापुरातील न्यायाधिकरण हे पूर्वीप्रमाणेच आता पूर्ववत चालू राहणार असल्याचेही आ. प्रणिती शिंदे यांनी सांगितले.
सोलापुरातील शाळा न्यायाधिकरण बंद करण्याचा शिक्षण आणि क्रीडा विभागाचा निर्णय तूर्त स्थगित करण्यात आला आहे. उस्मानाबाद आणि अहमदनगर या जिल्ह्यांचा शाळा न्यायाधिकरण गेल्या अनेक वर्षांपासून सोलापुरात सुरू आहे. मात्र अलीकडेच हे न्यायाधिकरण बंद करण्याचा आदेश २० एप्रिल २०२२ रोजी निघाला होता. या संबंधात आ. प्रणिती शिंदे यांनी शालेय शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांना भेटून न्यायाधिकरण बंद न करण्याविषयी विनंती केली होती. सद्यस्थितीत १५० अपिलं या न्यायाधिकरणाकडे प्रलंबित आहेत, तर रोज तिन्ही जिल्ह्यातून मिळून १५च्यावर अपिल दाखल होतात. शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांनी आ. प्रणिती शिंदे यांनी दिलेल्या पत्राची दखल घेऊन न्यायाधिकरण बंद करण्याबाबतचा निर्णय हा स्थगित ठेवण्याबाबत संबंधिताना आदेश दिले आहेत.
------------
वकिलांना मिळाला दिलासा...
सोलापूर येथील न्यायाधिकरणामध्ये मोठ्या प्रमाणावर काम असून, सोलापुरातील अनेक वकिलांना तेथे आपला व्यवसाय करण्याची संधी मिळत असते. सोलापूर जिल्हा बार असाेसिएशनने दिलेल्या माहितीनुसार येथे सद्यस्थितीत १५० अपिले प्रलंबित असून, दरमहा १५ ते २० नवी प्रकरणे दाखल होत असतात. त्यामुळे तीन जिल्ह्यांचे मिळून सोलापूर येथील न्यायाधिकरणात उत्तमरीत्या कामकाज चालते.