दुसऱ्या वर्षीही बोर्डाच्या परीक्षांचा गोंधळ कायम; अभ्यासू विद्यार्थी,पालकांना भविष्य सतावतेय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2022 05:10 PM2022-01-18T17:10:19+5:302022-01-18T17:10:25+5:30
गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह : प्रात्यक्षिक परीक्षांचा नाही पत्ता
सोलापूर : दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑनलाईन की ऑफलाईन या गोंधळात मार्च महिना आला तरीही बोर्डाच्या परीक्षेचा गोंधळ संपता संपेना. सलग दोन वर्षे ही स्थिती कायम राहिल्याने राज्यातील विद्यार्थ्यांमधील संभ्रमावस्था कमी होण्याऐवजी वाढताना दिसून येत आहे. त्यात ऑनलाईन परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या. मात्र, सराव परीक्षा आणि प्रात्यक्षिक परीक्षांचा निर्णय झाला नाही.
कोरोनामुळे मागील वर्षी दहावी-बारावीच्या परीक्षांचा गोंधळ शेवटपर्यंत सुरूच होता. शेवटी परीक्षाच रद्द झाल्या. शासन स्तरावर परीक्षांबाबत नेहमीच गोंधळाची स्थिती राहिल्याने विद्यार्थी आणि पालक वर्गात विद्यार्थ्यांच्या भवितव्याची चिंता वाढत आहे. यंदा कोरोनाचे संकट धूसर होत असताना परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या. मात्र, डिसेंबर महिन्याच्या अखेरीस पुन्हा कोरोनाने डोके वर काढले. त्यामुळे दहावी-बारावीच्या प्रात्यक्षिक आणि सराव परीक्षांचा निर्णय अद्याप जाहीर झाला नाही. परीक्षा ऑफलाईन होणार हे जाहीर झाले तर प्रात्यक्षिक परीक्षा ऑफलाईन की ऑनलाईन याबाबत विद्यार्थी अनभिज्ञ आहेत.
-----
गुणवत्तेची चिंता
सतत अभ्यासात आणि सरावात गुंतलेले विद्यार्थी यंदा परीक्षेच्या तयारीत होते. लेखी परीक्षा ऑफलाईन होणार याचा आनंद त्यांना वाटत होता. मात्र, गुणवत्तेबाबत शासन कोणती भूमिका घेणार याचा अंदाज लागत नाही. मागील वर्षी परीक्षा नाही अभ्यास नाही तरीही बहुतांशी विद्यार्थी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुणांनी उत्तीर्ण झाले. या निकालाने गुणवत्तेचे अक्षरश: तीन तेरा वाजले.
मुलांना सुट्टीचा कंटाळा आला आहे. त्यांना आता शाळा सुरू व्हावी असे वाटते. अभ्यासू मुले सध्याच्या परिस्थितीवर चिंतित आहेत. परीक्षांबाबतचा संभ्रम लवकरात लवकर दूर झाला पाहिजे तरच शिक्षण क्षेत्रात स्थैर्य निर्माण होईल.
-तानाजी माने, अध्यक्ष, सोलापूर जिल्हा माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ
------
परीक्षा केंद्रे
- दहावीसाठी - १७५
- बारावीसाठी - ११०
--
परिरक्षक कार्यालये
प्रत्येक तालुक्यासाठी एक याप्रमाणे सोलापूर जिल्ह्यातील तालुक्यासाठी ११ तर शहरासह १७ परिरक्षक कार्यालये असतील. या ठिकाणांहून परीक्षा केंद्रांना प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिकांसह परीक्षेच्या साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे.
-----
भरारी पथके - ३५०
-----
- परीक्षार्थींची संख्या
- दहावी - ६३,७९८
- बारावी - ५८,६७२
------
दहावी-बारावीच्या परीक्षांबाबत शासन संभ्रमात आहे. विद्यार्थ्यांना आता परीक्षा हव्यात. पूर्व परीक्षांचा निर्णय झाला नाही. त्याचा विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत आहे. लवकरात लवकर परीक्षांचा गोंधळ संपुष्टात आला पाहिजे.
-प्रकाश काशीद, उपप्राचार्य,
कुमठे प्रशाला व ज्युनिअर कॉलेज, कुमठे