सोलापूरचे अधिकारी भारावले; वाराणसीच्या योगी पॅटर्नचा आधार आता पंढरीच्या वारीलाही मिळणार
By Appasaheb.patil | Published: August 29, 2022 11:06 AM2022-08-29T11:06:15+5:302022-08-29T11:06:21+5:30
अधिकारी भारावले : ‘योगी मॉडेल’चा अभ्यास दौरा संपवून टीम परतली
आप्पासाहेब पाटील
सोलापूर : पंढरपूरच्या वारीला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक दर्शनसाठी येतात. यावेळी प्रशासन आणि राज्य सरकारी यंत्रणेवर मोठा भार असतो. व्यवस्थापन आणि सुरक्षा या दोन्हींसाठी कंबर कसून यंत्रणा कामाला लागलेली असते. त्यामुळेच, या यंत्रणांनी आता योगींच्या वाराणसी मॉडेलचा अभ्यास करण्यासाठी वाराणसी गाठली आहे. वाराणसी येथील मंदिरासह विविध भागांची पाहणी करून सोलापूरचे पथक पुन्हा सोलापुरात दाखल झाले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यांच्या मॉडेल पाहून सोलापूरची टीम भारावली.
पंढरीच्या आषाढी एकादशी सोहळ्याची दखल केंद्र सरकारने घेतली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही महिन्यांपूर्वीच देहूला भेट देत पंढरीच्या वारीचं कौतुक केलं. त्यानंतरही पंढरपूर मंदिर व परिसराचा आराखडा करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या. शासनाकडून त्याला हिरवा कंदिल मिळाल्यानंतर विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या सूचनेवरून जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पंढरपूरचे प्रांताधिकारी गजानन गुरव आणि सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचे विशेष कार्य अधिकारी राजेश तितर, प्रांत अधिकारी गजानन गुरव, पंढरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, जिल्हा नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे, दत्तात्रय गावडे, पंढरपूर मुख्याधिकारी अरविंद माळी हे योगी मॉडेलची पाहणी करून परतले. आता वाराणसीच्या धरतीवर पंढरपूर विकास आराखडा तयार होईल असे सांगण्यात आले.
पंढरपूर व वाराणसीच्या मंदिरात साम्य
- वाराणसी येथील मंदिर व पंढरपूरचे श्री. विठ्ठल-रूक्मिणी मंदिरात भरपूर साम्य आहे. आषाढी, कार्तिकी व अन्य वारीप्रमाणे तेथेही मोठया प्रमाणात यात्रा भरते. एवढेच नव्हे तर मंदिर व नदीचा भाग याचेही अंतर वाराणसीप्रमाणे पंढरपूरचेही आहे. त्यामुळे तेथील अभ्यास दौरा पंढरपूरच्या आराखड्यासाठी मोठया प्रमाणात मदत होईल असेही सांगण्यात आले.
पोलीस आयुक्तांनी केली मोठी मदत...
- सोलापूरची टीम वाराणसीत दाखल झाल्यानंतर वाराणसीचे पोलीस आयुक्त ए. सतीश गणेश यांनी संपूर्ण टीमचं स्वागत केलं, तसेच, क्राउड मॅनेजमेंट सिस्टमवर आपलं प्रेझेंटेशनही मांडलं. त्यानंतर विविध विषयांवर चर्चा झाली. शिवाय सोलापूरच्या टीमला संपूर्णपणे सहकार्य करण्याचा विश्वास वाराणसी पोलिसांनी दिला. त्यानंतर सोलापूरच्या टीमने विचारलेल्या प्रश्नाला उत्तरे दिली.
क्राउड मॅनेजमेंट सिस्टमचा अभ्यास
श्रावण महिना म्हणजे काशी-वारासणीत उत्सवांचा मेळा असतो. लाखो भाविक दाखल होतात. पंतप्रधानांचा मतदारसंघ असल्याने येथील यंत्रणाही सुपरफास्ट असते. येथील क्राउड मॅनेजमेंट सिस्टमची सध्या चर्चा आहे. या यंत्रणेचा अभ्यास सोलापूरच्या संपूर्ण टीमनं केल्याचे सांगण्यात आले. काशीतील क्राउड मॅनेजमेंट सिस्टमने सोलापूरच्या अधिकाऱ्यांनाही प्रभावित केलं आहे. त्यामुळेच, पंढरीच्या वारीचं क्राउड मॅनेजमेंट करण्याचे नियोजन टीमकडून करण्याचे आता नियोजन होईल, असेही एका अधिकाऱ्याने सांगितले.
गर्दीवर नियंत्रण व कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी वाराणसी येथील दौरा केला. वाराणसी येथील मंदिर व पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात खुप साम्य आहे. त्यामुळे पोलिसांच्या दृष्टीने योग्य नियोजन करण्यासाठी हा अभ्यास दौरा निश्चितच उपयोगी पडेल. यासाठी जिल्हाधिकारी मार्गदर्शन करतील.
- तेजस्वी सातपुते,
पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण