बहिणीच्या खून प्रकरणात मायलेकींना जन्मठेपेची शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2023 06:29 PM2023-02-22T18:29:24+5:302023-02-22T18:29:46+5:30
सोलापूर सत्र न्यायालयाने बहिणीच्या खून प्रकरणात मायलेकींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.
विलास जळकोटकर
सोलापूर : पैशाच्या आर्थिक देवाणघेवाणीतून बहिणीचा खून केल्याच्या प्रकरणात बहीण तिची मुलगी अशा दोघी महिलांना दोषी ठरवून जिल्हा न्यायालयात जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. एच. पाटवदकर यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी झाली. साखराबाई शिवाजी मल्लाव व अनिता विजय भुई अशी शिक्षा सुनावलेल्या महिलांची नावे आहेत.
या खटल्याची पार्श्वभूमी अशी की, यातील मयत फिर्यादी आणि साखराबाई मल्लाव या दोघी सख्ख्या बहिणी आहेत. तिऱ्हे (ता. उत्तर सोलापूर) येथे १२ डिसेंबर २०२० मध्ये यातील मयत महिला व साखराबाई यांच्ख्त अनैतिक संबंध व आर्थिक देवाणघेवाणीतून वाद झाला होता. यातून आरोपी साखराबाईने घरात घुसून फिर्यादी मयत महिलेचा (बहीण) पोटात चाकूने वार करून गंभीर जखमी केले होते. घटनेच्या दिवशी साखराबाईची मुलगी अनिता विजय भुई मारहाण करताना जवळ होती. जखमी अवस्थेत मयतेला सोलापूरच्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते.
उपचार सुरू असताना फिर्यादीचा मृत्यू झाला. तत्पूर्वी उपचार घेत असताना पोलिसांनी मयत फिर्यादी महिलेचा डॉक्टरांसमक्ष जबाब घेतला होता. यानंतर दोघांविरुद्ध गुन्हा नोंदवून तपासानंतर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.या खटल्यात प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी पाठ फिरवली तरी सरकार पक्षाने जप्त केलेले कपडे, तांत्रिक बाबींच्या आधारे साखराबाई मल्लाव आणि सोबत असलेल्या अनिता भुई या आई व मुलीने गुन्हा केल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. जिल्हा व सत्र न्यायाधीश पाटवदकर यांनी दोघींना दोषी ठरवून जन्मठेपेसह दंडाची शिक्षा सुनावली. या खटल्यात सरकार पक्षाकडून सरकारी वकील ॲड. दत्तूसिंग पवार, आरोपीतर्फे व्ही. डी. फताटे यांनी काम पाहिले.
नेत्र साक्षीदार फुटले तरी...
खटल्याच्या सुनावणीवेळी घटनास्थळी असलेले प्रत्यक्ष साक्षीदार फुटले. मात्र मयत महिलेवर उपचार सुरू असताना पोलिसांनी डॉक्टरांसमोर जो जबाब घेतला होता तो महत्त्वपूर्ण ठरला तसेच मयत महिलेची साडी अन्य कपडे आणि त्यावरील रक्ताचे डाग, आणि तांत्रिक मुद्दे सरकार पक्षाने न्यायालयासमोर आणले.