आयोध्येत होणाऱ्या श्री राम मंदिरामागे राष्ट्र उभारणीची भावना : स्वामी गोविंददेव गिरी

By संताजी शिंदे | Published: January 4, 2024 05:09 PM2024-01-04T17:09:58+5:302024-01-04T17:10:13+5:30

विषमतारहित, आक्रमणरहित विकास म्हणजे हिंदुत्व या दृष्टिकोनातून रामलल्लाच्या प्रतिष्ठापनेकडे पाहिले पाहिजे.

The spirit of nation building behind the Sri Ram Temple in Ayodhya: Swami Govinddev Giri | आयोध्येत होणाऱ्या श्री राम मंदिरामागे राष्ट्र उभारणीची भावना : स्वामी गोविंददेव गिरी

आयोध्येत होणाऱ्या श्री राम मंदिरामागे राष्ट्र उभारणीची भावना : स्वामी गोविंददेव गिरी

सोलापूर : वास्तविक पाहता राम मंदिराची उभारणी यापूर्वीच होणे अपेक्षित होते, मात्र पाचशे वर्षाचा संघर्ष व तीन लाख लोकांच्या बलिदानानंतर प्रभू श्री रामचंद्राची प्रतिष्ठापना व मंदिराचे उद्घाटन होत आहे. देशाची अस्मिता असलेल्या श्री राम मंदिर उभारणीच्या मागे एकजीव राष्ट्र उभारणीची भावना असल्याचे मत श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केले.

विषमतारहित, आक्रमणरहित विकास म्हणजे हिंदुत्व या दृष्टिकोनातून रामलल्लाच्या प्रतिष्ठापनेकडे पाहिले पाहिजे. आपले राष्ट्रपिता महात्मा गांधीजी हे देखील रामराज्य हा शब्द नेहमी वापरत असत. रामाच्या मुद्द्यावरून राजकारण होणे निश्चितच अपेक्षित नव्हते. देशभरातील लहान - लहान खेड्यांमधील  रामचंद्र भूमी न्यासाला मिळणारा प्रतिसाद पाहता संपूर्ण भारत सध्या राममय झाल्याचे त्यांनी सांगितले.

राम मंदिराची निर्मिती आणि २२ जानेवारी रोजी होत असलेल्या सुमूहुर्तावर होणारी रामलल्लांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना या घटनेला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे . त्याचप्रमाणे सामाजिक प्रयत्नही कारणीभूत असल्याचे स्वामीजींनी सांगितले.

अयोध्या ही मनूची राजधानी होती. त्यामुळे जगातील ही पहिली राजधानी असल्याचा उल्लेख करून स्वामीजी म्हणाले की, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अयोध्या शहराचा वेगाने विकास केला आहे. विमानतळ आणि रेल्वे स्थानकाचे उद्घाटन नुकतेच झाले असून एक सुनियोजित अयोध्या नगरी वसविण्याचे काम प्रगतीपथावर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राम मंदिराच्या उभारण्यासाठी गेली पाचशे वर्षे करावा लागलेला संघर्ष आणि यासाठी तीन लाख लोकांनी दिलेली प्राणाची आहुती निश्चितच खेदजनक आहे . परंतु आता  रामलल्लाची मूर्ती स्वस्थानी प्रतिष्ठापित होत असल्याने निश्चितच समाधान असल्याचे त्यांनी सांगितले.
 

Web Title: The spirit of nation building behind the Sri Ram Temple in Ayodhya: Swami Govinddev Giri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.