सोलापूरचे एसटी स्टँड प्रवाशांनी गजबजले; पुण्याला फेऱ्याही झाल्या चौपट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2022 08:11 PM2022-02-08T20:11:00+5:302022-02-08T20:11:03+5:30
कोल्हापूर गाड्यांनाही गर्दी : खासगी ट्रॅव्हल्सचे दर घटले
सोलापूर : एसटी गाड्या बंद असल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती. सोलापुरातील प्रवाशांना खासगी वाहनाने पुण्याला जाण्यासाठी एका सीटसाठी हजार रुपये मोजावे लागत होते; पण बस सुरू झाल्यामुळे खासगी ट्रॅव्हल्स चालकांचे दरही घसरले आहेत. महिनाभरापूर्वी पुण्यासाठी जेमतेम दोन ते तीन फेऱ्या सुरू होत्या. आता सोलापूर आगाराच्या पुण्याला दिवसाकाठी १६ पेक्षा जास्त म्हणजेच चौपट फेऱ्या होत आहेत.
राज्यभर एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्यामुळे अनेक ठिकाणी एसटी सेवा पूर्णत: कोलमडली होती; पण सोलापुरात काही प्रमाणात कर्मचारी कामावर परतल्यामुळे एसटी सेवा सुरू झाली आहे. प्रवाशांच्या मागणीनुसार व प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन सोलापूर आगारातून मोठ्या प्रमाणात एसटी सुरू करण्यात येत आहेत. यामुळे आगाराचे उत्पन्न सहा ते सात लाखांपर्यंत पोहोचले आहे; पण अद्यापही एसटी सेवा पूर्ण क्षमतेने सुरू झालेली नाही. यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
आगारातून १०० पेक्षा जास्त फेऱ्या
आगारातून दिवसाकाठी १०० पेक्षा जास्त गाड्या धावत असल्या तरी त्यातील १६ ते १७ फेऱ्या पुण्यासाठी धावत आहेत. शिवाय इतर आगारांतून जवळपास सात ते आठ गाड्या पुण्यासाठी सुटत आहेत. शिवाय पंढरपूर, अक्कलकोट, बार्शी, मोहोळ या मार्गावरही जादा एसटी गाड्या सोडण्यात येत आहेत.
..पण पंढरपूरसाठी नाही
सध्या सोलापूर आगारातून बऱ्यापैकी एसटी गाड्या सुरू झाल्या आहेत. आम्ही दररोज सोलापूर ते पंढरपूरदरम्यान प्रवास करतो; पण आम्हाला सायंकाळी सोलापुरातून पंढरपूरला जाण्यासाठी एसटी गाड्या मिळत नाहीत. यामुळे आमची मोठी गैरसोय होते. अनेक वेळा निवेदन देऊनही याबाबत कोणतेही पाऊल उचलले गेले नाही. यामुळे याबाबत आम्ही परिवहनमंत्र्यांना तक्रार करणार आहोत.
- कुमार नरखेड, प्रवासी
कोल्हापूर मार्गावरही धावू लागली एसटी
कोल्हापूर मार्गावर एसटी सुरू करण्याची प्रवाशांची मागणी होती. या मागणीनुसार आगारातून कोल्हापूर मार्गावरही एसटी सुरू करण्यात आली आहे. याचा प्रवाशांना चांगला फायदा होत आहे. शिवाय सातारा, सांगली, मार्गावरही एसटी सुरू झाल्याने या गाड्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.