शिक्षण विभागातील भ्रष्ट्राचाराविरोधात सोलापुरातील शिक्षकांचे उद्यापासून आमरण उपोषण
By Appasaheb.patil | Published: August 14, 2023 04:34 PM2023-08-14T16:34:04+5:302023-08-14T16:34:56+5:30
मंगळवार १५ ऑगस्ट २०२३ पासून शिक्षक भारती संघटनेचे शेकडो सभासद, शिक्षक हे आमरण उपोषण करणार असल्याची माहिती शिक्षक भारती संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुजितकुमार काटमोरे यांनी 'लोकमत' शी बोलताना दिली आहे.
सोलापूर : शिक्षण विभागामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार, दप्तर दिरंगाई होत आहे. एकही काम पैसे दिल्याशिवाय पूर्ण होत नाही असा सर्वसामान्य शिक्षकांचा अनुभव आहे. प्रशासनाच्या या कारभारामुळे एक हणमंत आपल्यातून गेला आहे, आता भ्रष्टाचारामुळे एकही जीव जायला नको. भ्रष्टाचाराच्या विरोधात सार्वत्रिक लढा उभाण्यासाठी सोलापुरातील शिक्षक एकत्र आले आहेत. मंगळवार १५ ऑगस्ट २०२३ पासून शिक्षक भारती संघटनेचे शेकडो सभासद, शिक्षक हे आमरण उपोषण करणार असल्याची माहिती शिक्षक भारती संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुजितकुमार काटमोरे यांनी 'लोकमत' शी बोलताना दिली आहे.
दरम्यान, कै. हणमंत विठ्ठल काळे, शिपाई यांची तात्काळ शालार्थ आयडी देण्यात येऊन तेरा वर्षाचा फरक अदा करण्यात यावा, त्यांच्या पत्नीला तात्काळ अनुकंपा तत्वावरती नियुक्ती देण्यात येऊन मान्यता देण्यात यावी तसेच याला कारणीभूत असणाऱ्या तत्कालीन उपसंचालक व त्यांच्या कार्यालयातील अधिकारांवर मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्यात यावेत, वरिष्ठ वेतनश्रेणी व निवडश्रेणी साठी पात्र असणाऱ्या शिक्षकांचे प्रस्ताव संस्थेकडून जाणीवपुर्वक दिले जात नाहीत. तरी सर्व पात्र शिक्षकांची यादी जाहीर करण्यात यावी यासह महत्वाच्या २० मागण्यांसाठी हे उपोषण असणार आहे. तरी जिल्ह्यातील शिक्षकांनी शिक्षण विभागाच्या विरोधात एल्गार पुकारण्यासाठी आमरण उपोषणात सहभागी व्हावे असेही आवाहन शिक्षक भारती संघटनेच्यावतीने करण्यात आले आहे.