तापमान ४० अंशाच्या खाली पण, घामाने सोलापूरकर हैराण; ढगाळ वातावरण
By शीतलकुमार कांबळे | Published: June 3, 2024 07:42 PM2024-06-03T19:42:54+5:302024-06-03T19:43:12+5:30
मागील चार दिवसांपासून सोलापूरचे तापमान हे ४० अंश सेल्सिअसच्यावर गेले. सोमवार ३ जून रोजी तापमानात घट होऊन तापमान ४० अंशाच्या खाली आले.
शीतलकुमार कांबळे
सोलापूर : मागील चार दिवसांपासून सोलापूरचे तापमान हे ४० अंश सेल्सिअसच्यावर गेले. सोमवार ३ जून रोजी तापमानात घट होऊन तापमान ४० अंशाच्या खाली आले. मात्र, तरीही सोलापूरकर घामाने हैराण झाले. ढगाळ वातावरण असल्याने सोमवारच्या सकाळी सुर्यदर्शन लवकर झाले नाही. काही दिवसांपासून पावसाची प्रतिक्षा सोमवारी पूर्ण होईल अशी अनेकांना आळा होती. प्रत्यक्षात पाऊस आलाच नाही. मात्र, दमट हवेमुळे नागरिकांना प्रचंड उकाड्याला सामोरे जावे लागले. कामानिमित्त घरातून बाहेर पडलेले नागरिक घामाने भिजून गेले.
गुरुवार ३० मे ते रविवार २ जून दरम्यान सोलापूरचे तापमान हे ४० अंश सेल्सिअसवर होते. ३० मे रोजी ४०.०, ३१ मे रोजी ४०.४, १ जून रोजी ४०.२ तर २ जून ४०.६ अंश सेल्सिअस इतके तापमान होते. सोमवार ३ जून रोजी सोलापूरचा पारा हा ३९.१ अंशावर विसावला. हवामान विभागाच्या अंदाजानुसार ३ जून ते ७ जून दरम्यान पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या दरम्यान पाऊस आला तर सोलापूरकरांची उकाड्यापासून सुटका होऊ शकते.