विठुरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांची मंदिर समितीकडून होणार सोय; कशी असेल व्यवस्था?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 16:30 IST2025-04-04T16:29:32+5:302025-04-04T16:30:03+5:30
वाढती उन्हाची दाहकता लक्षात घेऊन, पत्राशेडमध्ये कुलर व फॅन बसवण्यात येत आहेत.

विठुरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांची मंदिर समितीकडून होणार सोय; कशी असेल व्यवस्था?
पंढरपूर : चैत्री यात्रा कालावधीत सुमारे २ ते ३ लाख भविक श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी येतात. या भाविकांना सुविधा देण्याची जबाबदारी १२०० कर्मचारी व स्वयंसेवक पार पाडणार असल्याची माहिती सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली. अन्नछत्रामध्ये दुपारी १२ ते २ व रात्री ७ ते ९ या वेळेत अन्नदान सुरू राहणार असून, दर्शन रांगेत दशमी, एकादशी, द्वादशीला लिंबू सरबत, मठ्ठा व तांदळाची अथवा साबुदाण्याच्या खिचडीचे वाटप करण्यात येणार आहे.
या यात्रा कालावधीत श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराशी संबंधित असलेल्या परंपरांचे कटाक्षाने पालन करण्यात येणार असून, त्याबाबतचे आवश्यक नियोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये नवमीला श्रीराम नवमी जन्मोत्सवानिमित्त विठ्ठल महाराज देहूकर फड (बिद्रीकर मंडळी) ह. भ. प. श्रीकांत महाराज पातकर, पंढरपूर यांचे कीर्तन, ह. भ. प. आजरेकर महाराज पंढरपूर यांचा व्दादशीला नैवेद्य, त्रयोदशीला ह. भ. प. गुरू बाबासाहेब आजरेकर महाराज, पंढरपूर यांची कीर्तनाची परंपरा असून, एकादशीला पहाटे श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेची नित्यपूजा अनुक्रमे सदस्य ह. भ. प. शिवाजीराव मोरे व व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांच्या हस्ते सपत्नीक संपन्न होत आहे.
व्हीआयपी दर्शनावर निर्बंध
यात्रा कालावधीत येणाऱ्या भाविकांना श्रीचे सुलभ व जलद दर्शनाबरोबरच दर्शन रांग सुलभव जलद गतीने चालवण्यासाठी अनुभवी कमांडोजची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच भाविकांच्या हस्ते होणाऱ्या पूजेची संख्या कमी करून, व्हीआयपी दर्शनावर निर्बंध व दर्शनाची वेळ वाढवून सकाळी ६ ते रात्री १२ वाजता करण्यात आली आहे.
दर्शन रांगेत सुविधा
दर्शनरांग व्यवस्थापनाच्या दृष्टीने स्कायवॉक पासून पत्राशेड पर्यंत बॅरिकेटिंग करून त्यावर ताडपत्री टाकणे व कायमस्वरूपी ४ पत्राशेड येथे तात्पुरते ४ असे एकूण ८ पत्राशेड उभारण्यात येत आहेत. या दर्शन रांगेत मॅट, बसण्याची सुविधा, थंड पिण्याचे पाणी, तात्पुरते उड्डाणपूल, शौचालये, विश्रांती कक्ष, बाथरूम, लाईव्ह दर्शन इ. सुविधा उपलब्ध आहेत. तसेच वाढती उन्हाची दाहकता लक्षात घेऊन, पत्राशेडमध्ये कुलर व फॅन बसविण्यात येत आहेत. याशिवाय, महिला भाविकांच्या सोईसाठी सॅनिटरी नॅपकीन, हिरकणी कक्ष तसेच श्रींचा प्रसाद म्हणून बुंदी व राजगिरा लाडूप्रसादाची उपलब्धी आहे.
भाविकांच्या सुरक्षेसाठी व्यवस्था
आपत्कालिन व्यवस्थेच्या दृष्टीने सोलापूर महानगरपालिका यांचेकडील रेस्क्यू व्हॅन प्रशिक्षित कर्मचाऱ्यांसह, सिझफायर यंत्रणा, अत्याधुनिक १०० नग सीसीटीव्ही कॅमेरे व त्यासाठी कंट्रोल रूम, वायरलेस यंत्रणा, जनरेटर, मेटल डिटेक्टर, मोबाइल लॉकर, चप्पल स्टँड, सार्वजनिक प्रसारण सूचना प्रणाली, चौकशी कक्ष, बॅग स्कॅनर मशीन, अपघात विमा पॉलिसी इ. व्यवस्था करण्यात आली आहे.