वैष्णवाचा पताका हाती दिसणार, शेगावीचा राणा सोलापुरात येणार; जाणून घ्या सविस्तर वेळापत्रक
By Appasaheb.patil | Published: June 12, 2023 03:02 PM2023-06-12T15:02:21+5:302023-06-12T15:03:42+5:30
शुक्रवारी सोलापूर शहरात होणार आगमन; ठिकठिकाणी होणार पुष्पवृष्टी.
सोलापूर : वैष्णव पताका हाती घेऊन संत गजानन महाराज पालखी बुलढाण्यातून काही दिवसांपूर्वी विठ्ठलाच्या भेटीसाठी रवाना झाली आहे. हाच पालखी सोहळा येत्या गुरूवारी २६ जून २०२३ रोजी सकाळी ९ वाजता सोलापूर जिल्ह्यात दाखल होणार आहे. ओम गजानन.. श्री गजानन.. ज्ञानोबा, माऊली, तुकारामाच्या जयघोषात ३३ दिवसांचा प्रवास करीत शेगावच्या संत गजानन महाराज पालखी सोलापुरात आगमन होणार आहे.
दरम्यान, गुरूवार २२ जून २०२३ रोजी सकाळी ९ वाजता पालखीचे आगमन सोलापूर शहरातील पाणी गिरणी चौकात झाल्यानंतर महापौर, सोलापूर महानगर पालिका यांचे शुभहस्ते स्वागत झाल्यानंतर पालखी सोहळा - तुळजापूर वेस - कस्तुरबा मार्केट - सम्राट चौक - श्री सदगुरु प्रभाकर स्वामी महाराज मंदिर येथे दुपारी १२ वाजता भोजन व विश्रांती करणार आहे. त्यानंतर दुपारी २ वाजता सम्राट चौक - बाळीवेस - चाटी गल्ली - भुसार गल्ली - कुंभार वेस - कन्नाचौक - राजेंद्र चौक मार्गे कुचन प्रशाला येथे सायंकाळी ५ वाजता आगमन व मुक्कामासाठी थांबणार आहे.
शुक्रवार २३ जून २०२३ रोजी हा पालखी सोहळा कुचन प्रशालेतून सकाळी ६ वाजता पालखीस सुरूवात होवून पालखी जोडबसवण्णा चौक- पदमशाली चौक - सिव्हील हॉस्पीटल - बेडर पुल - नळ बझार - जगदंबा चौक - लष्कर - सात रस्तामार्गे उपलप मंगल कार्यालय येथे सकाळी १० ते ११ दरम्यान आगमन करणार आहे. शनिवार २४ जून रोजी सकाळी ६ वाजता उपलप मंगल कार्यालयापासून पालखी मोदी पोलीस चौकी - जुना एप्लायमेंट चौक- डफरीन चौक- पार्क चौक - रामलाल चौक- भैया चौकमार्गे दमाणी नगर येथे सकाळी ११ वाजता आगमन व भोजन करून हा पालखी सोहळा तिहै मार्गे पंढरपुरसाठी प्रस्थान होणार आहे.
५४ वर्षापासून अविरत सेवा..
श्री संत गजानन महाराज यांचे भव्य मंदिर बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे आहे. गेल्या ५४ वर्षांपासून शेगाव येथून श्री संत गजानन महाराज यांची पालखी शेगावहुन पंढरपूर कडे पायी जाते. हजारोंच्या संख्येने वारकरी भक्त या पालखी सोबत पायी असतात. जागोजागी वारकरी व विठ्ठल भक्त या पालखीची पूजा करून गुलाबपुष्प अर्पण करत पालखीचे स्वागत करतात.