भाजपच्या आणखी एका पदाधिकाऱ्याविरुद्ध सोलापुरातील पीडितेची महिला आयोगाकडे धाव!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2022 09:39 PM2022-07-17T21:39:23+5:302022-07-17T22:12:21+5:30
सोलापुरातील महिलेने ६ मे २०२२ रोजी नवी मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली होती.
- राकेश कदम
सोलापूर : भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांचे बेडरुममधील व्हिडिओ प्रकरण ताजे आहे. यातच आता सोलापुरातील एका महिलेने भाजपच्या पदाधिकाऱ्यांविरोधात केलेल्या तक्रार प्रकरणात न्याय मिळावा, अशी मागणी राज्य महिला आयोगाकडे रविवारी केली आहे.
सोलापुरातील महिलेने ६ मे २०२२ रोजी नवी मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली होती. या तक्रारीत म्हटले होते की, माझा २०११ मध्ये अलिबाग जि. रायगड येथील एका व्यक्तीशी विवाह झाला होता. काही वर्षातच घटस्फोट झाला. यानंतर माझी एका भाजपच्या पदाधिकाऱ्यांसोबत मैत्री झाली.
आमच्या अनेक भेटींमध्ये त्यांनी त्यांचा घटस्फोट झाल्याचे दाखविले. त्यामुळे त्यांच्यासोबत मी ६ ऑक्टोबर २०१५ रोजी नवी मुंबईतील गावदेवी मंदिरात विवाह केला. यानंतर त्यांच्याकडून फसवणूक झाल्याचे लक्षात आले. माझ्यावर अत्याचार झाला. माझा व्हिडिओ व्हायरल करुन बदनामी करण्याची धमकीही दिली. मला व माझ्या कुटुंबीयांना त्यांच्याकडून धोका असल्याचे या महिलेने तक्रारीत म्हटले होते.
या महिलेने राज्य महिला आयोगाकडे एप्रिल महिन्यात तक्रार केली होती. दरम्यान, श्रीकांत देशमुख यांचे प्रकरण समोर आल्यानंतर या महिलेने रविवारी पुन्हा महिला आयोगाकडे तक्रार केली आहे. आपल्याला न्याय मिळावा. रायगड आणि सोलापूर पोलिसांकडे दिलेल्या तक्रारींबाबत काय झाले याबद्दल कळवावे अशी मागणी केली आहे.
रायगड पोलिसांना स्मरणपत्र देणार!
सोलापुरातील महिलेची तक्रार आमच्यापर्यंत आली होती. या प्रकरणात काय कारवाई केली याबद्दल अहवाल सादर करावा, असे पत्र राज्य महिला आयोगाकडे रायगड पोलिसांना दिले होते. सोमवारी पुन्हा स्मरणपत्र देऊन अहवाल मागवून घेणार आहोत, अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी ‘लोकमत’ला दिली.