राज्याच्या मनोधैर्य योजनेतून सोलापुरातील पीडितांना मिळाली कोट्यवधींची मदत
By Appasaheb.patil | Published: January 30, 2023 04:00 PM2023-01-30T16:00:29+5:302023-01-30T16:00:51+5:30
मदतीचे विविध टप्पे; पीडितेने साक्ष फिरविल्यास होते व्याजासकट वसुली
आप्पासाहेब पाटील, सोलापूर: लैंगिक अत्याचारग्रस्त पीडितांना मनोधैर्य योजनेंतर्गत मदत केली जाते. या प्रकरणात जर एखाद्या पीडितेने न्यायालयात साक्ष फिरविल्यास दिलेली सर्व रक्कम व्याजासह वसूल करण्यात येते. मनोधैर्य योजनेमुळे अनेक पीडितांना आर्थिक मदतीशिवाय त्यांचे समुपदेशन, निवारा, वैद्यकीय व कायदेशीर मदत आधार सेवा तत्परतेने उपलब्ध करून त्यांचे पुनर्वसन करण्याचे काम यशस्वीपणे करण्यात येत आहे.
बलात्कार, बालकांवरील लैंगिक अत्याचार, ॲसिड हल्ला यामध्ये बळी पडलेल्या महिला आणि बालकांना अर्थसहाय्य व पुनर्वसन करण्यासाठी मनोधैर्य योजना राज्य मंत्रिमंडळाने मंजूर केली. या योजनेची अंमलबजावणी संपूर्ण राज्यात २ ऑॅक्टोबर, २०१३ पासून सुरू झाली. पीडितांना किमान रु. २ लाख ते ३ लाखापर्यंत आर्थिक मदत दिली जाते. गुन्हेगारांना गंभीर शिक्षा देणे आवश्यक असतानाच या गुन्ह्यातील पीडित महिला व बालकांना प्रतिष्ठा व आत्मविश्वास पुन्हा मिळवून देण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे.
अत्याचार प्रकरणात अनेक वेळा फिर्यादी व आरोपी यांच्यामध्ये तडजोड होते. शिवाय कोर्टात केस सुरू असताना पीडितेकडून खोटी तक्रार दिल्याचे कबूल करण्यात येते. शिवाय अनेक कारणांमुळे कोर्टात केस आरोपीला शिक्षा होईपर्यंत चालत नाही. यात आरोपी, फिर्यादी व साक्षीदार हे फितूर होतात. त्यामुळे मोठी अडचण होते.
पीडितेला तीन लाखांपर्यंत आर्थिक मदत...
या योजनेंतर्गत बलात्कार व बालकांवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी किमान दोन लाख रुपये व विशेष प्रकरणामध्ये कमाल तीन लाख अर्थसहाय्य देण्यात येते. त्याचप्रमाणे ॲसिड हल्ल्यात जखमी झालेल्या महिला व बालकांस त्यांचा चेहरा विद्रूप झाल्यास अथवा कायमचे अपंगत्व आल्यास तीन लाख रुपये आणि ॲसिड हल्ल्यात इतर जखमा झालेल्या महिला व बालकांना ५० हजार रुपये इतके अर्थसहाय्य देण्यात येते.
असे होते मदतीचे वाटप....
महिला व बाल विकास विभागामार्फत या योजनेनुसार अर्थसहाय्य देण्यात येते. पोलिसात तक्रार दाखल होते. मेडिकल होते. संबंधित प्रकरणाची कागदपत्रे वरिष्ठ पातळीवर पत्राद्वारे पाठविली जातात. त्यावर विधी व सेवा प्राधिकरणाचे शिष्टमंडळ चर्चा करून किती रक्कम द्यावयाची याबाबतचा निर्णय घेतात. वेगवेगळ्या कारणांसाठी वेगवेगळी रक्कम दिली जाते. सुरूवातीस ठराविक रक्कम दिली जाते, त्यानंतर उर्वरित रक्कम बँकेत एफडी म्हणून केसचा निकाल लागेपर्यंत ठेवली जाते.
समाजात ती पुन्हा उभी झाली पाहिजे. सन्मानाने तिने जगले पाहिजे यासाठी मनोधैर्य योजनेतून पीडितांना मदत केली जाते. ही रक्कम टप्प्याटप्प्याने दिली जाते. काही रक्कम एफ.डी. म्हणून बँकेत ठेवली जाते. मागील काही वर्षात शेकडो पीडितांना मदत देण्यात आली आहे. तरूणींनी आत्मनिर्भर बनायला हवे. -ॲड. देवयानी किणगी, सोलापूर
पीडित महिला व बालकांना प्रतिष्ठा व आत्मविश्वास, पूर्वस्थिती परत मिळवून देण्याबरोबरच त्यांना मानसिक आघातातून बाहेर काढून त्यांना त्यांच्या पायावर उभे करण्यासाठी, एक नवी उमेद देण्यासाठी मनोधैर्य योजनेतून पीडितांना मदत केली जाते. अत्याचाराच्या अनेक प्रकरणात आरोपींना मोठी शिक्षा झाली आहे. -ॲड. स्वाती बिराजदार, सोलापूर