व्हिडिओ आला अन् शोध सुरू झाला; वनविभागाने पकडले सशाची शिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2022 05:01 PM2022-07-24T17:01:11+5:302022-07-24T17:01:17+5:30
कातडी काढण्याचाही प्रयत्न : पोखरापुरातील दोघांवर गुन्हा
सोलापूर : सशाची शिकार करणाऱ्यांचा एक व्हिडिओ वनविभागाकडे आला. या व्हिडिओच्या माध्यमातून नेमकी शिकार कुठे झाली, याचा शोध घेऊन वनविभागाने दोघांना पकडले. दोन्ही आरोपींना न्यायालयाने दोन दिवसांची वन कोठडी सुनावली होती. ती २३ जुलै रोजी पूर्ण झाल्यानंतर त्यांना जामीन मिळाला आहे.
वनपरिक्षेत्र मोहोळ अंतर्गत सशाची शिकार केल्याचा एक व्हिडिओ वनविभागाकडे आला. त्यावरून मोहोळ वनपरिक्षेत्र अधिकारी सतीश उटगे यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी पोखरापूर येथे जाऊन चौकशी केली. त्यात हणमंत विठ्ठल खंदारे (वय ४८), बिरुदेव विठ्ठल खंदारे (वय ५२) यांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सशाची शिकार करून त्याचे मांस खाण्याच्या उद्देशाने त्याची कातडी काढण्याचा प्रयत्न करण्याचे निदर्शनास आले. त्यावरून आरोपींचा शोध घेण्यात आला. आरोपी दुसऱ्या शेतात कामाला गेले होते. तिथे जाऊन त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले. आरोपींना सध्या जामीन मिळाला असून दोषारोपपत्राची कार्यवाही सुरू आहे.
उपवनसंरक्षक डी. एम. पाटील, सहायक वनसंरक्षक एल. ए. आवारे, सहायक वनसंरक्षक बी. जी. हाके यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी सतीश उटगे, वनपाल एस. जी. जवळगी, वनरक्षक एस. आर. कुर्ले, एस. टी. थोरात यांच्या पथकाने ही कारवाई केली.
-------
काय होते व्हिडिओत..
वनविभागाकडे एका अज्ञात व्यक्तीकडून व्हिडिओ आला. या व्हिडिओमध्ये सशाला मारून त्याचे मांस काढत असतानाचे चित्रित केले होते. हा व्हिडिओ खरा किंवा सोलापूर जिल्ह्यातीलच आहे का याची तपासणी करण्यात आली. अज्ञात व्यक्तीने दिलेली माहिती व व्हिडिओवरून तो कोणत्या गावाचा आहे, हे समजले. त्यावरून आरोपींचा शोध घेण्यात आला.