बचतीचा मंत्र... गाव राज्यात गाजलं अन् सोयाबीननं मिळवून दिला पुरस्कार
By विठ्ठल खेळगी | Published: March 14, 2023 03:19 PM2023-03-14T15:19:26+5:302023-03-14T15:20:54+5:30
पाऊस चांगला पडत असल्याने खरीप पेरणी व सोयाबीन क्षेत्रात वाढ झाली आहे
विठ्ठल खेळगी
सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील कळमण सोयाबीन उत्पादक गटाने ठरविले अन् करूनही दाखविले आहे. एकत्रित बियाणे व खतांच्या खरेदीतून पैसे वाचविले, शिवाय टोकण यंत्राने पेरणी करून बियाण्यांची ५० टक्के बचत केली. अतिवृष्टी व संततधारेने जमिनीवर पाणी थांबले. मात्र, टोकण पद्धतीच्या लागवडीमुळे पिकांचे नुकसान टळल्याचे शेतकरी सांगतात. हाच संघ उत्तर तालुक्यात भारी ठरला असून, एक लाखाचे बक्षीस मिळविले आहे.
उत्तर सोलापूर तालुक्यातील कळमण येथील शेतकऱ्यांनी सोयाबीन उत्पादन उच्चांकी घेतल्याने पाणी फाउंडेशन फार्मर कप स्पर्धेत प्रथम क्रमांक आला आहे. एक लाखाचे बक्षीस घेणाऱ्या कळमण सोयाबीन गटशेती गटाने उत्पादन खर्चातही मोठी बचत केली आहे. वडाळा, रानमसलेपासून उत्तर भागातील गावांची शेती ही पावसाळ्यावर अवलंबून. खरीप पेरणी योग्य पाऊस पडायचा नाही व डिसेंबरनंतर पाण्यासाठी टँकरवर अवलंबून. ज्वारी काढणीसाठी गावातून पाणी शेतात घेऊन जावे लागायचे. मात्र, मागील दोन-तीन वर्षांत पाऊसमान चांगले असल्याने बागायती क्षेत्रात वाढ होत आहे.
पाऊस चांगला पडत असल्याने खरीप पेरणी व सोयाबीन क्षेत्रात वाढ झाली आहे. मात्र, खरीप हंगामात भरपूर पाऊस पडत आहे, त्यामुळे पिके पाण्यात खराब होत आहेत. अशाही परिस्थितीत शेतकऱ्यांनी सोयाबीन लागवडीसाठी बीबीएफ टोकण यंत्राच्या साह्याने पेरणीला पसंती दिली आहे. सोयाबीनची पेरणी करण्यासाठी गटातील शेतकऱ्यासाठी आवश्यक बियाण्यांची एकत्रित खरेदी केली. खत एकत्रित घेतले, शिवाय बीबीएफ यंत्राने पेरणी केली. यामुळे उत्पादन खर्चात मोठी बचत झाली.
सोयाबीन विक्रीतून ३८ लाख रुपये
५५ एकरांसाठी ५५ पिशव्या बियाण्यांऐवजी टोकण यंत्रामुळे २९ पिशव्यांत पेरणी पूर्ण झाली. २६ पिशव्या बियाण्यांची बचत झाली. पिशव्या फोडून बियाण्यांचे वाटप केले. खताच्या सामूहिक खरेदीत १५०० रूपये खर्च कमी झाला. ५५ एकरात ७१२ क्विंटल सोयाबीन उत्पादन निघाले. विक्रीतून ३८ लाख ७२ हजार ५०२ रुपये आले. झालेला खर्च ५ लाख ८२ हजार ७७० रूपये वजा केल्यानंतर ३३ लाख १८ हजार ५६९ रूपये शिल्लक राहिले.