ग्रामस्थांनी संशयितास पकडून पोलिसांना दिले
By काशिनाथ वाघमारे | Published: July 5, 2024 08:52 PM2024-07-05T20:52:42+5:302024-07-05T20:53:03+5:30
किडेबिसरीतील घरफोडीचा २४ तासात छडा
काशिनाथ वाघमारे
सोलापूर : संशयावरून ग्रामस्थांनी पकडलेल्या संशयित आरोपीला सांगोला पोलिसांनी ताब्यात घेताच किडेबिसरीतील घरफोडीचा २४ तासात छडा लागला. या कारवाईत साडेचार तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले असून त्याला न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावल्याचे पोलिसांनी सांगितले.
विनायक बजरंग कुटाळे (रा. ३०, रा. ढालगाव, ता. कवठेमंकाळ, सध्या रा. संजय नगर, सांगली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून शुक्रवार, ५ जुलै रोजी त्यास सांगोला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने रविवार, ७ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. आरोपीकडून चोरीचे अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली.
पाणी पिण्याच्या बहाण्याने अनोळखी चोरटा एका वृध्दाच्या घरात शिरून कपाटातील तीन तोळे सोन्याचे गंठण, चार ग्रॅम सोन्याचे लॉकेट, दोन ग्रॅम कानातील टॉप्स, पाच ग्रॅम कानातील वेल, दोन ग्रॅम सोन्याची साखळीसह १ ग्रॅम सोन्याचे बदाम असे एकूण १ लाख ३२ रुपयांचे साडेचार तोळे सोन्याचे दागिने चोरून पोबारा केल्याची घटना गुरुवार, ३ जुलै रोजी दुपारी २ च्या सुमारास किडेबिसरी येथे घडली होती.
या घटनेनंतर वसंत निवृती कोळेकर यांनी सांगोला पोलिसात फिर्याद दिली होती. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि चोरीच्या तपासासाठी पोलिसांचे पथक रवाना केले. पोलिस चोरट्याचा शोध घेत असताना किडेबिसरी ग्रामस्थांनी संशयावरून तरुणास पकडल्याची माहिती मिळाली. त्यास ताब्यात घेऊन पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने चोरीची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत केला. दरम्यान सांगली, कवठेमंकाळ, आटपाडी व सांगोला पोलिस स्टेशनच्या हद्दीत अनेक ठिकाणी झालेल्या घरफोडी उघडकीस येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही कामगिरी पोलिस निरीक्षक भीमराव खणदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक आदिनाथ खरात, पोलिस हेडकॉन्स्टेबल सचिन वाघ, केदारनाथ भरमशेट्टी, पोलिस नाईक प्रकाश कोष्टी, पोलिस कॉन्स्टेबल लक्ष्मण वाघमोडे यांच्या पथकाने बजावली.