वन्यजीव गणनेत माळढोक दिसलाच नाही; ३७४ काळवीट, चार नीलगायी दिसल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2022 10:49 AM2022-05-18T10:49:54+5:302022-05-18T10:50:04+5:30
बुद्ध पाैर्णिमेच्या दिवशी वन्यजीव गणना : १८ पाणवठ्यांवर केले निरीक्षण
सोलापूर : गंगेवाडी व माळढोक अभयारण्य येथे बुद्ध पौर्णिमेला सोमवार सायंकाळी ते मंगळवारी पहाटेपर्यंत वन्यजीवांची गणना करण्यात आली. यात ३७४ काळवीट, चार नीलगायी, २७ मोर यांच्यासह विविध प्राणी व पक्षी आढळले. यासोबतच सिद्धेश्वर वनविहार येथेही वन्यजीवांची गणना करण्यात आली.
बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी रात्री चांगला प्रकाश असतो. या प्रकाशात पाणवठ्यावर आलेल्या प्राणी, पक्ष्यांची गणना करणे सोपे जाते. म्हणून सोमवार व मंगळवारी वन्यजीव व पक्ष्यांच्या गणनेस सुरुवात झाली. नान्नज अभयारण्यात वनविभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांसोबतच स्थानिक नागरिक व वन्यजीवप्रेमींची मदत झाली. एकूण ३० जणांनी १८ ठिकाणी असलेल्या पाणवठ्यांजवळ निरीक्षण केले. तिथे वॉच टॉवर (मचाण), लपणगृह यांची व्यवस्था करण्यात आली होती.
अभयारण्यात विविध भागात वॉच टॉवर उभारण्यात आले होते. टॉवरवर बसून वन्यजीवप्रेमींनी प्राणी व पक्ष्यांची गणना केली. यासाठी त्यांना नोंदवही देण्यात आली होती. या वन्यजीव गणनेत सर्वात जास्त काळविटांची संख्या (३६४) आढळली. त्यापाठोपाठ रानडुक्कर (२२०), ससा (३२), मोर (२७), मुंगूस (१३) यांच्या संख्येची नोंद झाली.
------
वनविहारात मोर, ससे, घुबड
श्री सिद्धेश्वर वनविहार येथे वन्यजीव प्राणी व पक्ष्यांची गणना करण्यात आली. यात मुंगूस (४), ससे (५), घुबड (२), मोर (४), लांडोर (३) आढळले. वनविहारात निसर्ग अनुभव कार्यक्रम घेण्यात आला. यासोबतच मान्यवरांनी पर्यावरणप्रेमींना मार्गदर्शन केले. डॉ. निनाद शहा, सर्प अभ्यासक राहुल शिंदे, एल. ए. आवारे, डी. पी. खलाणे यांनी विविध विषयांवर व्याख्यान दिले. यावेळी उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील, न्यायदंडाधिकारी एन.एम. बिराजदार, संतोष पाटील, बी.जी हाके आदी मान्यवर उपस्थित होते.
--------
गंगेवाडी- नान्नज अभयारण्यात आढळलेले वन्यजीव
- काळवीट - ३६४
- लांडगा - ११
- ससा - ३२
- खोकड -८
- मुंगूस - १३
- रानडुक्कर - २२०
- रानमांजर - ७
- मोर - २७
- सायाळ - ३
- घोरपड - ३
- कोल्हा १
- नीलगाय - ४
-------