पुष्पाच्या गाण्यावर थिरकल्या सोलापुरातील महिला; जाणून घ्या काय होतं नेमकं कारण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2022 04:42 PM2022-03-01T16:42:06+5:302022-03-01T16:42:57+5:30
साई महिला महोत्सव : मराठी, हिंदी गीतावर नृत्य
सोलापूर : डोळ्यावर काळा चष्मा, गुडघ्यापर्यंत येणारा शर्ट आणि लुंगी चालण्याची वाकडी स्टाईल या पुष्पाच्या कॅरेक्टरने सगळ्यांनाच वेड लावले आहे. त्याचाच फिवर श्री साई महिला महोत्सवात दिसून आला. सोलो डान्स प्रकारात एका महिलेने श्रीवल्ली, ‘सामी- सामी’ या गीतावर नृत्य करत सगळ्यांची मने जिंकली.
पुष्पाचा फिवर सध्या सोशल मीडियापासून टपव्हीपर्यंत सगळीकडेच पहायला मिळत आहे. त्यात अल्लू अर्जुनच्या स्टाईलची कॉपी करणारे दिसत आहेी. अगदी तशाच पद्धतीने एका महिलेने पुष्पा चित्रपटातील श्रीवल्ली, सामी या गीतावर नृत्य सादर केले. या नृत्याला रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली. नृत्याचे वैशिष्ट्य म्हणजे फक्त पुष्पाचा स्टाईल न दाखवता एक विचार या नृत्यातून दाखविला. याच नृत्यात ‘कोण होतास तू, काय होतास तू’ असा प्रश्नही विचारण्यात आला. आपण कुणाचे अनुकरण करायला हवे हे सांगण्यासाठी नृत्य संपताना पुष्पाचा फोटो बदलून त्या ऐवजी छत्रपती शिवाजी महाराज व स्वामी विवेकानंद यांचा फोटो दाखविला.
१२० महिलांचा सहभाग
या स्पर्धा दोन गटात घेण्यात आल्या. १६ ते ३० वर्षे आणि ३१ वर्षे व त्यापासून पुढे असा स्पर्धेचा गट होता. या कार्यक्रमात १२० महिलांनी उत्तम नृत्याविष्काराचे सादरीकरण केले. त्यांनी नृत्याचे, पेहरावाचे व हावभावाचे उत्तम सादरीकरण केले होते. महिला स्पर्धकांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. रंगीला मारो, दाजिबा, पिंगा, लावणी, अधीर मन झाले, घर मोरे, बरसो रे मेघा, पाश्चात्य नृत्य अशा विविध गाण्यांवर एकल नृत्याचे सादरीकरण झाले.