घाटातील डोंगर फोडण्याच्या कामाला दिली गती, शिंगणापूर घाट २२ ऑगस्टअखेर बंदच राहणार
By काशिनाथ वाघमारे | Published: August 5, 2023 05:44 PM2023-08-05T17:44:54+5:302023-08-05T17:45:46+5:30
सातारा-सोलापूर जिल्ह्यांना जोडणारा प्रमुख घाटमार्ग महिनाभर बंद आहे. वाहनधारक, भाविक, स्थानिक प्रवाशी त्रस्त आहेत.
सोलापूर : रस्ता रुंदीकरणाच्या कामामुळे दहिवडी-नातेपुते मार्गावर शिंगणापूर घाटात वाहतूक २४ जुलैपासून बंद आहे. सध्या घाटातील डोंगर फोडण्याचे काम प्रगतीपथावर असून २२ ऑगस्टअखेर शिंगणापूर घाटरस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती अकलूज बांधकाम विभागाने दिली.
सातारा-सोलापूर जिल्ह्यांना जोडणारा प्रमुख घाटमार्ग महिनाभर बंद आहे. वाहनधारक, भाविक, स्थानिक प्रवाशी त्रस्त आहेत.
अहमदनगर-डाळज-कराड राज्यमार्ग अंतर्गत नातेपुते मार्गावर शिंगणापूर घाटातील रस्ता रुंदीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सोलापूर जिल्हा प्रशासनाने यापूर्वीच २४ जुलै ते ७ ऑगस्ट अखेर घाटातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यास परवानगी दिली आहे. सध्या डोंगर फोडण्याचे ५० ते ६० टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यातच डोंगर फोडताना दरडी कोसळून रस्त्याचे संरक्षक कठडे व भिंती ढासळल्या आहेत. दरडीचे मोठेमोठे दगड रस्त्यावर कोसळताहेत. ते हटविण्याचे कामही सुरू आहे. मात्र नैसर्गिक अडचणी, कड्याची उंची यामुळे कामात अडथळे येत आहेत.
पंधरा दिवसांची मागितली मदत
* प्रशासनाने परवानगी दिलेल्या मुदतीत काम पूर्ण होत नसल्याने ठेकेदार कंपनीने उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी बांधकाम विभागाकडे आणखी १५ दिवसांची मुदतवाढ मागितली आहे.
* अकलूज बांधकाम विभागाने ८ ऑगस्ट ते २२ ऑगस्टअखेर घाटातील वाहतूक बंद ठेवून वाहतूक पूर्वीप्रमाणे पर्यायी मार्गाने वळविण्यासंदर्भात सोलापूर जिल्हाधिकारी यांचेकडे परवानगी मागितली आहे.
* त्यामुळे शिंगणापूर घाटरस्ता २२ ऑगस्टअखेर वाहतुकीस बंद राहणार असल्याचे अकलूज बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता सुनीता पाटील यांनी सांगितले.