देवदर्शनासाठी पंढरपूरला गेलेल्या महिलेच्या घरात चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:29 AM2021-02-27T04:29:13+5:302021-02-27T04:29:13+5:30
गौडवाडी येथील रंजना नानासो गडदे यांच्या घरी भावकीतील वैशाली विलास गडदे हिचे अधूनमधून येणे-जाणे असल्यामुळे तिला रंजना सोन्याचे दागिने ...
गौडवाडी येथील रंजना नानासो गडदे यांच्या घरी भावकीतील वैशाली विलास गडदे हिचे अधूनमधून येणे-जाणे असल्यामुळे तिला रंजना सोन्याचे दागिने व पैसे घरातील लोखंडी पेटीमध्ये ठेवत असल्याचे माहित होते. दरम्यान ६ फेब्रुवारी रोजी रंजना गडदे, वैशाली गडदे व गावातील इतर महिलांनी एकादशीनिमित्त पंढरपूरला देवदर्शनाला जाण्याचे नियोजन केले होते. ७ फेब्रुवारी रोजी गावातील सर्व महिला पंढरपूरला जाण्यासाठी एकत्र आल्या. मात्र वैशाली हिने मला घरात काम असल्याचे कारण सांगत पंढरपूरला येणार नसल्याचे सांगितले. त्या दिवशी सर्वजण पंढरपूरहुन दर्शन घेऊन रात्री ८ वाजता परत घरी आले. २३ फेब्रुवारी रोजी सकाळी १० च्या सुमारास रंजनाची मुलगी सविता ही पुण्याहुन घरी आली होती. त्यावेळी त्या दोघींनी घरात ठेवलेली पेटी उघडून पाहिले असता त्यात १० हजार रुपये सोन्याची दीड तोळ्याची मोहनमाळ, १० हजाराची सोन्याची एक तोळ्याची बोरमाळ, ९ हजार रुपये सोन्याची अर्धा तोळ्याची चैन, बदाम, २० हजाराचे १३ ग्रॅम कानातील चैन, रिंगा, ९ हजाराचे ५ ग्रॅम सोन्याचे कानातील झुमके व नाकातील नथ व रोख ७ हजार असा ऐवज गायब असल्याचे दिसून आले. त्यानंतर रंजनाने चोरीचे दागिने व पैशाबाबत वैशाली गडदे हिच्याकडे विचारपूस केली असता तिने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने तिच्यावर संशय बळावला आहे.