...तर कृषी केंद्रांना टाळे ठोकणार : श्रीकांत देशमुख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:16 AM2021-06-10T04:16:16+5:302021-06-10T04:16:16+5:30
सोलापूर जिल्ह्यात सर्वदूर पुरेसा पाऊस झाल्याने शेतकऱ्यांकडून खरिप पेरण्याची लगबग सुरू झाली आहे. खते, बी-बियाणांची मागणी वाढली ...
सोलापूर जिल्ह्यात सर्वदूर पुरेसा पाऊस झाल्याने शेतकऱ्यांकडून खरिप पेरण्याची लगबग सुरू झाली आहे. खते, बी-बियाणांची मागणी वाढली आहे. या काळात कृषी दुकानदार रासायनिक खते, बियाणांची चढ्यादराने विक्री करत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांमधून येऊ लागल्या आहेत. १९ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला १४ हजार ७७५ कोटींच्या रासायनिक खत अनुदानाचा ऐतिहासिक निर्णय घेतल्यामुळे खतांचे दर कमी झाले आहेत; परंतु खुल्या बाजारात कृत्रिम टंचाई निर्माण करून खते व बियाणांची अव्वाच्या सव्वा दराने विक्री केली जात असल्याच्या तक्रारी जिल्ह्यातील शेतकऱ्यांतून येऊ लागल्या आहेत.
शेतकऱ्यांना बियाणे खरेदीची पावती देताना एमआरपी किमतीची पावती दिली जात आहे. मात्र, पैसे घेताना चढ्या दराने घेत असल्याच्या तक्रारी केल्या जात आहेत. चढ्या दराची पावती मागितल्यास शेतकऱ्यांना दिली जात नाही. अगोदरच कोरोनामुळे शेतकऱ्यांचे अर्थकारण कोलमडले आहे. कृषी विभागाकडून फिरते भरारी पथक नेमून संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक थांबवावी, अशी मागणी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी केली आहे. यावेळी भाजप जिल्हा युवा मोर्चाचे अध्यक्ष प्रकाश घोडके, जिल्हा उपाध्यक्ष गणेश भोसले, बार्शी तालुकाध्यक्ष मदन दराड, अक्कलकोट तालुकाध्यक्ष मोतीराम राठोड, जिल्हा परिषदेचे भाजप पक्षनेते आण्णाराव बाराचारे आदी उपस्थित होते.