मग कसं पंत म्हणतील तसं !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:21 AM2021-03-28T04:21:30+5:302021-03-28T04:21:30+5:30

एकेकाळी पंढरीचं राजकारण दोनच व्यक्तिमत्त्वांभोवती फिरत राहिलेलं. एक पंत दुसरे अण्णा. दोन्ही गट बारामतीनिष्ठ. कोणत्याही संस्थेची सत्ता असो, आलटून ...

Then how will Pant say! | मग कसं पंत म्हणतील तसं !

मग कसं पंत म्हणतील तसं !

Next

एकेकाळी पंढरीचं राजकारण दोनच व्यक्तिमत्त्वांभोवती फिरत राहिलेलं. एक पंत दुसरे अण्णा. दोन्ही गट बारामतीनिष्ठ. कोणत्याही संस्थेची सत्ता असो, आलटून पालटून दोघांकडेच राहिलेली. तिसऱ्याचा कधी शिरकाव न झालेला; मात्र २००९ साली अकलूजकरांनी नीरा नदी सोडून भीमा गाठली, तसं सारं गणित बदललं. बिघडलं. सत्तेचा केंद्रबिंदू पंतांचा वाडा सोडून नानाचा बंगला बनला. मग काय सलग तीन इलेक्शनमध्ये नानांची टोपी झंझावात बनून राहिली.

अकरा वर्षांपूर्वीची ती चूक दुरुस्त करण्याची संधी आता कुठं प्रशांत पंतांना मिळालीय. एक तर आमदारकी वाड्यावर आली पाहिजे किंवा रिमोट कंट्रोलमध्ये असली पाहिजे, हे पक्के ध्यानात घेऊनच ते एकेक पाऊल सावधपणे टाकताहेत. जेव्हा समाधान मंगळवेढेकरांसाठी चंदूदादा कोथरुडकरांनी शब्द टाकला, तसं त्यांनी देवेंद्र पंत नागपूरकर यांच्याकडे धाव घेतली; मात्र सरकारच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगायला आसुसलेल्या देवेंद्र पंतांच्या डोक्यात वेगळीच गणितं. पंढरपूरची सीट हिसकावून घेतली तर जनतेला सध्याचे सरकार नकोय हे सिद्ध करायला पेन ड्राईव्हची गरज नाही भासणार, हे त्यांच्या लक्षात आलेलं. त्यामुळे पंतनिष्ठा यापेक्षाही पक्ष प्रतिमा याक्षणी खूप महत्त्वाची असल्याचं त्यांनी प्रशांत पंतांना पटवून दिलं. सध्या प्रत्येक प्रकरणात क्लिपचा वापर करणाऱ्या देवेंद्रपंतांना या निवडणुकीत प्रशांत पंतांची जुनी क्लिप नक्कीच परवडणारी नव्हती. म्हणून शेवटच्या क्षणापर्यंत दामाजी त्यांच्या तोंडी राहिले. किती योगायोग पहा.. आजपर्यंत पंढरपूरच्या राजकारणात विठ्ठल की पांडुरंग याचा निकाल दामाजीवर अवलंबून असायचा. आता विठ्ठल की दामाजी हा निर्णय पांडुरंग पट्ट्यातली २२ गावं घेऊ शकतील. मात्र अजूनही दोन दिवस बाकी. शेवटच्या क्षणापर्यंत घडू शकतं काहीही. बदलू शकते उमेदवारी. तोपर्यंत लगाव बत्ती ..

…अक्कलकोटच्या गौडगाव मठाचे महाराज तसेच धर्माचे गाढे अभ्यासक. संस्कृतीचा इतिहास त्यांना पाठ. भवितव्य ओळखण्यातही म्हणे तसे ते हुशार. म्हणूनच की काय आजकाल सार्वजनिक सोहळ्यात हात जोडून लोकांना विनंती करताहेत, मला खासदार म्हणू नका हो.. मला फक्त महाराज म्हणा. यातच मला आत्मिक समाधान, चपळगावच्या लसीकरण कार्यक्रमात त्यांनी सर्वांसमोर अशीच विनंती केली, तेव्हा सारेच पडले चाट. त्यांना आता खासदार राहण्यात आत्मिक इंटरेस्ट नसावा, असं गर्दीतला एक जण म्हणाला. इल्ला..

हंग इल्ला. त्यांना आता आपण खासदार राहणार नसल्याची बहुतेक खात्री वाटली असावी, दुसरा हळूच कानात पुटपुटला. नेमकं कारण महाराजांनाच माहीत. असो. जे इतिहास बदलायला जातात, त्यांचं भविष्य काय असतं, हे परफेक्ट एक जणच सांगू शकतो. तो म्हणजे बुळ्ळा. होय. शिवसिद्ध बुळ्ळा. लगाव बत्ती.

आयपीएस बदली फोन टॅप अहवालात सोलापूरशी संबंधित अनेक आजी-माजी अधिकाऱ्यांची नावे लिस्टमध्ये झळकली. विशेष म्हणजे सोलापूरला पोस्टिंग मिळावं म्हणून एका एक्साईजवाल्यांनं तब्बल अर्धा खोका ओपन करण्याचीही तयारी दर्शविली. सोलापूरचा एवढा हाय रेट पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या. एवढं काय सोलापूरला लागून गेलंय, असा प्रश्नही अनेकांच्या डोळ्यासमोर उभा ठाकला. मुंबईनंतर सर्वाधिक टीआरपी सोलापूरचा, या मागचं खरं कारण खूप कमी लोकांना ठाऊक. मंथली अन् तोडी हा इथल्या दोन नंबर धंदेवाल्यांचा आवडीचा शब्द ठरलेला. म्हणूनच एकेकाळी इथल्या जेलरोडला सर्वोच्च बोलीचं मानांकन मिळालेलं. सोलापुरात जॉईन झालेल्या चांगल्या-चांगल्या प्रामाणिक मंडळींनाही इथून ट्रेण्ड करूनच या लोकांनी पाठवून दिलेलं. जाऊ द्या साहेब .. मिटवून टाका, हीच मेन्टॅलिटी राहिलेली. आता सांगा.. खोकी क्लबचा मेंबर बनायला कोणाला नाही आवडणार ? मग.. येताय का सोलापुरात ? लगाव बत्ती

Web Title: Then how will Pant say!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.