आधीच पदे रिक्त, त्यात दोन डॉक्टर गेले टेंभुर्णी आरोग्य केंद्राचा कारभार रामभरोसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:18 AM2021-07-17T04:18:29+5:302021-07-17T04:18:29+5:30
कोरोना संसर्गाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली असताना टेंभुर्णी प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ. अमोल माने व डॉ. ...
कोरोना संसर्गाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली असताना टेंभुर्णी प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ. अमोल माने व डॉ. विक्रांत रेळेकर या दोघांचा करार १२ जुलै रोजी संपल्याने टेंभुर्णी आरोग्य केंद्राची संपूर्ण जबाबदारी वैद्यकीय अधिकारी नंदकुमार घोळवे यांच्यावर येऊन पडली आहे. पूर्वीपासूनच टेंभुर्णी आरोग्य केंद्रात नऊ पदे रिक्त आहेत.
टेंभुर्णी शहर व टेंभुर्णी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अखत्यारीत असलेल्या आठ गावांची लोकसंख्या ६० ते ७० हजार आहे. या सर्व लोकांची आरोग्य सेवा टेंभुर्णी प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रे यांच्यावर अवलंबून आहे. दैनंदिन ओपीडी, लसीकरण, टेस्टिंग, लहान मुलांचे नियमित लसीकरण ही कामे उपलब्ध कर्मचाऱ्यांमार्फत सुरू होती; परंतु आता कंत्राटी पद्धतीने भरलेल्या दोन डॉक्टरांचा करार संपल्याने ते दोन डॉक्टर कमी झाले आहेत. त्यामुळे केवळ एक डॉक्टर टेंभुर्णी प्राथमिक आरोग्य केंद्राचा कार्यभार सक्षमपणे पार पाडू शकणार नाही.
----
तिसरी लाट आल्यास गंभीर परिणाम होतील
रिक्त पदे तत्काळ न भरल्यास कोरोना रुग्णांसह इतर रुग्णांनाही वैद्यकीय सेवा व्यवस्थित मिळणार नाही. कोरोनाची तिसरी लाट आल्यास आणखीनच गंभीर परिस्थिती निर्माण होईल. या सर्व गोष्टीचा विचार करून जिल्हाधिकाऱ्यांनी यामध्ये गांभीर्याने लक्ष घालून टेंभुर्णी प्राथमिक आरोग्य केंद्रातील रिक्त असलेली डॉक्टरांसह सर्व पदे तत्काळ भरावीत, अशी मागणी संजय कोकाटे यांनी केली आहे. सदर निवेदनाच्या प्रती आरोग्यमंत्री राजेश टोपे व पालकमंत्री दत्तामामा भरणे यांना पाठविण्यात आल्या आहेत.