आरक्षण निघालेले सदस्य नसल्याने राजूर, टाकळीत सरपंच निवडीचा पेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:40 AM2021-02-06T04:40:50+5:302021-02-06T04:40:50+5:30
तालुक्यातील सरपंच, उपसरपंच निवडीची तारीख जाहीर झाली आहे. सरपंच पदाच्या आरक्षणामध्ये राजूर ग्रामपंचायत अनुसूचित जातीसाठी (एससी) आरक्षित आहे, परंतु ...
तालुक्यातील सरपंच, उपसरपंच निवडीची तारीख जाहीर झाली आहे. सरपंच पदाच्या आरक्षणामध्ये राजूर ग्रामपंचायत अनुसूचित जातीसाठी (एससी) आरक्षित आहे, परंतु सदस्यांच्या निवडणुकीत एक ही जागा अनुसूचित जातीसाठी नव्हती. त्यामुळे निवडून आलेल्या सदस्यांमध्ये एकही सदस्य या प्रवर्गातील नाही. सरपंच निवडीच्या वेळी अनुसूचित जातीचा सदस्य नसल्याने या जागेसाठी उमेदवारी अर्ज निर्वाचित सदस्यांना भरता येणार नाही. या ठिकाणी एकही सदस्य नसल्याने आता ही सरपंच पदाची जागा रिक्त ठेवावी लागणार आहे.
टाकळी ग्रामपंचायत अनुसूचित जमाती ( एसटी) महिलेसाठी आरक्षित आहे. या ग्रामपंचायतीमध्ये निवडून आलेल्या सदस्य अनुसूचित जमातीचा सदस्य नाही. ही जागा रिक्त आहे. निर्वाचित सदस्यांमध्ये सर्वसाधारण जागेवरून अनुसूचित जमातीची महिला असल्यास सरपंच पदासाठी अर्ज दाखल करता येईल, परंतु तशी स्थिती नाही. त्यामुळे या ग्रामपंचायतीचे सरपंचपद देखील रिक्त ठेवावे लागणार आहे. उपसरपंच पदाची निवडणूक प्रक्रिया पार पडेल.
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार राजुर ग्रामपंचायतीमध्ये अनुसूचित जाती एससी प्रवर्गाचा सदस्यच नाही. याबाबतचा अहवाल सरपंच पदाच्या निवडीनंतर अध्यासी अधिकारी तहसील कार्यालयाला सादर करतील. तहसीलदारामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवला जाईल. जिल्हाधिकारी परिस्थितीचे अवलोकन करून या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण बदलू शकतात.
पोटनिवडणूक घेण्यासाठी पत्र
टाकळी ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत अनुसूचित जमाती (स्त्री) गटातून एकही अर्ज दाखल झाला नव्हता. आता स्थानिकांनी ही जागा पोटनिवडणूक घेऊन भरणार असल्याचे पत्र तहसीलदारांना सादर केले आहे. तोपर्यंत ही जागा रिक्त ठेवावी लागणार आहे .