पैसे नाहीत म्हणून प्यावे लागते नदीचे पाणी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 02:02 PM2019-05-30T14:02:51+5:302019-05-30T14:05:13+5:30
सोलापूर-विजयपूर रोडवरील वडकबाळकरांची पाण्यासाठी पायपीट; शुद्ध पाण्यासाठी एटीएमची सोय, पण लोक पितात टाकळी जलवाहिनीचे पाणी
राजकुमार सारोळे
सोलापूर: सीना नदीत गेली कित्येक वर्षे महापालिकेच्या ड्रेनेजचे थेट पाणी मिसळल्याने दूषित झालेल्या नदीच्या पाण्याच्या प्रभावाने जलाशये क्षारयुक्त झाली. आता उन्हाळ्यात पाण्याची टंचाई निर्माण झाल्यामुळे नदीकाठची अनेक गावे पिण्याच्या पाण्यासाठी तहानलेली आहेत. विजापूर महामार्गाशेजारी वसलेल्या वडकबाळ ग्रामपंचायतीने नागरिकांना शुद्ध पाण्यासाठी एटीएमची सुविधा दिली तरी पैसे नाहीत म्हणून अनेक जण सोलापूरला पाणीपुरवठा करणाºया टाकळी-सोरेगाव जलवाहिनीतील प्रक्रिया न केलेले पाणी पिण्यासाठी वापरत आहेत.
दुष्काळी स्थितीमुळे यंदा सीना नदी डिसेंबरपासून कोरडी आहे. पण या नदीच्या पाण्याचा उपयोग वडकबाळकरांना नाहीच. नदीचे पाणी पिण्यालायक तर नाहीच, पण ते वापरण्यायोग्य नसते. नदीच्या पाण्यात गेल्या कित्येक वर्षांपासून सोलापूरच्या ड्रेनेजचे पाणी मिसळल्याने नदी क्षारयुक्त झाली आहे. याचा परिणाम परिसरातील जलाशयावर झाला आहे. नदीकाठापासून दोन किलोमीटर अंतरावर कोठेही बोअर किंवा विहीर खोदा तेथे क्षारयुक्त पाणी येते. त्यामुळे नदीकाठच्या नंदूर, वांगी, वडकबाळ, हत्तूरच्या पाणीपुरवठा योजनांवर परिणाम झाला आहे.
वडकबाळ ग्रामपंचायतीने नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी तांड्याजवळ विहीर खोदली आहे. या विहिरीच्या पाण्यावर ग्रामपंचायतीत फिल्टर बसविले आहे. फिल्टरला जोडलेल्या एटीएम मशीनमधून पाच रुपयाला घागरभर पाणी दिले जाते. गावची तहान या पाण्यावर भागवली जाते. तर गावात असलेल्या तीन बोअरवरून वापरण्यासाठी पाणी आणले जाते. नव्याने आणखी एक बोअर घेण्यात आला आहे. या बोअरवर पंप बसवावा, अशी नागरिकांची मागणी आहे.
पण तांडा, भीमनगर, वस्त्यांवरील लोकांना दररोज विकतचे पाणी घेणे शक्य नाही. असे लोक दररोज महामार्गाशेजारी नाल्यात असलेल्या सोलापूर महापालिकेच्या जलवाहिनीच्या व्हॉल्व्हवरून पाणी भरून आणतात. वास्तविक हे पाणी अशुद्ध आहे.
सोलापूर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत टाकळी जॅकवेलमधून पंपिंग करून हे पाणी सोरेगाव जलशुद्धीकरण केंद्रात नेले जाते. पण या व्हॉल्व्हवरून वडकबाळ, हत्तूर, वांगी, होनमुर्गीपर्यंतचे लोक तहान भागविण्यासाठी पाणी नेत असल्याचे दिसून आले. काही नागरिकांनी हे पाणी वापरासाठी नेत असल्याची माहिती दिली. गावातील बोअरचे पाणी क्षारयुक्त आहे. त्यामुळे जनावरेसुद्धा ते पाणी पीत नाहीत. उलट हे पाणी भीमा नदीतील असल्याने जनावरे पाणी पितात. याशिवाय आंघोळ, कपडे धुण्यासाठी हे पाणी चांगले असल्याचे मत व्यक्त केले. भीमनगर येथील महिलांनी हे पाणी पिण्यासाठी वापरत असल्याचे सांगितले.
एटीएममध्ये दररोज पैसे देऊन पाणी आणणे परवडत नाही. त्यामुळे या जलवाहिनीवरील पाणी चांगले आहे. आम्ही हेच पाणी पिण्यासाठी वापरतो, असे सांगितले. महामार्गावरील वेगाने येणाºया वाहनांतून जीव वाचवत महिला व लहान मुले पाण्यासाठी पायपीट करताना दिसतात.
ग्रामसेविका संगीता धसाडे यांनी मात्र ग्रामस्थांना पिण्याच्या शुद्ध पाण्याची सोय केली आहे. लोक शुद्ध पाणी पिण्यासाठी वापरतात तर जनावरे व इतर वापरासाठी या जलवाहिनीवरून पाणी आणतात, असे सांगितले. आम्ही आठवड्यातून एकदा जलवाहिनीवरील पाणी पिण्यालायक नसल्याची दवंडी देतो, असे सांगितले.
महापालिकेचे दुर्लक्ष
- वडकबाळ व परिसरातील लोकांना पिण्यासाठी पाणी नाही. त्यामुळे महापालिकेच्या जलवाहिनीचे व्हॉल्व्ह लिक करून पाणी घेतले जाते. गळतीने पाणी वाया जाते. यापेक्षा महापालिकेने वडकबाळ ग्रामपंचायतीला एक इंची कनेक्शन दिल्यास पाण्याचा अपव्यय टळेल, लोकांची सोय होईल आणि उलट महापालिकेला पाणीपट्टी मिळेल. पण राजकारणामुळे याकडे दुर्लक्ष झाल्याचे एकाने सांगितले.
पिण्याच्या पाण्याची सोय नाही. त्यामुळे या व्हॉल्व्हमधून आम्ही पाणी भरतो. पिण्यासाठी व वापराच्या पाण्यासाठी हेच पाणी वापरतो. गावातील नळाला कित्येक दिवसातून पाणी नाही. उन्हाळा असो की पावसाळा पाण्याचे हाल आहेत.
- मीनाक्षी शिंदे
जनावरे व घरातील वापरासाठी महापालिकेच्या जलवाहिनीवरील पाणी नेतो. इथे वडकबाळबरोबरच वांगी, हत्तूर, होनमुर्गीचे लोक पाणी नेण्यासाठी येतात. बोअरला क्षारयुक्त पाणी आहे. त्यामुळे गरिबांना दररोज विकतचे पाणी घेणे परवडत नाही.
- सूर्यकांत पुजारी