सोलापुरातील निर्बंध आणखी वाढवू मात्र सध्या लॉकडाऊनबाबत कोणताही विचार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 02:28 PM2021-03-31T14:28:20+5:302021-03-31T14:28:26+5:30
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, रोज सहा ते सात हजार तपासण्या होतील
सोलापूर : कोरोना प्रतिबंधक उपाययोजना आणखीन कडक करण्यासाठी जिल्हा प्रशासन नियोजन करीत आहे. कारवाया आणखीन वाढवू. तसेच निर्बंधही आणखी वाढवू. सध्या लॉकडाऊनचा विचार नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी लोकमतला दिली.
ॲक्टिव्ह रुग्ण शोधण्यासाठी रोज सहा ते सात हजार कोरोना टेस्ट करण्यात येणार असल्याचे शंभरकर यांनी सांगितले. राज्यात कोरोना कहर वाढतोय. तशीच परिस्थिती सोलापूर जिल्ह्यात आहे. या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू होईल की काय? अशी भीती नागरिकांमध्ये आहे. यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील लॉकडाऊनबाबत इशारा दिला होता. त्यामुळे लॉकडाऊनच्या चर्चेला ऊत आला आहे. याबाबत जिल्हाधिकारी शंभरकर यांना विचारले असता त्यांनी सध्या लॉकडाऊनचा विचार नाही, असे स्पष्ट केले.
सोलापूर जिल्ह्यात ५७ हजार आरटी-पीसीआर व दीड लाख रॅपिड टेस्टच्या किट उपलब्ध आहेत. हे किमान महिनाभर पुरतील. कमी पडल्यास इतर जिल्ह्यातून तातडीने मागविता येतील. सध्या प्रती दिन ६ हजार जणांची तपासणी करण्यात येत आहे. अश्विनी रूग्णालयातील तपासणी मशीन सुरू करण्यात आली आहे. सुरुवातीला फक्त ९० तपासण्या होत होत्या, आता आपल्याकडे ६ ते ७ हजार तपासण्या केल्या जात असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सांगितले, मंगल कार्यालये, दुकाने सील करणे, नागरिकांवर कारवाई केली जात आहे. आतापर्यंत विविध माध्यमांतून ५ कोटी रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये. सॅनिटायझर्सचा वापर करावा, सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करावा.
जिल्ह्यात ४ लाख को-मॉर्बिड रुग्ण
- सोलापुरात एकूण ४ लाख १३ हजार को-मॉर्बिड रुग्ण आहेत. ४५ वर्षांवरील व यापुढील अधिकाधिक नागरिकांना तसेच को-मॉर्बिड रुग्णांना लस देण्यासाठी नियोजन सुरू आहे.
- जिल्ह्यात ४०० प्राथमिक उपकेंद्र असून त्यापैकी ३०० प्राथमिक उपकेंद्रातून लसीकरण देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सध्या प्रतीदिन ६ ते ७ हजार जणांना लस दिली जात आहे. सध्या ३१ हजार लसीचे डोस असून आठवडाभर पुरतील. प्रशासनाकडून एक लाख लसीची मागणी नोंदविली असून दोन दिवसांत आणखी लस उपलब्ध होणार आहे.
----------पूर्ण------------