रेडझाेनमधील गावात आता केवळ पाचच बाधित रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:16 AM2021-06-01T04:16:58+5:302021-06-01T04:16:58+5:30
मोहोळ : संपूर्ण तालुक्यात दुस-या लाटेने कहर केला असून अनेकांना जीव गमवावा लागला आहे. ७५ रुग्ण बाधित आढळून ...
मोहोळ : संपूर्ण तालुक्यात दुस-या लाटेने कहर केला असून अनेकांना जीव गमवावा लागला आहे. ७५ रुग्ण बाधित आढळून आल्याने जे गाव रेडझोन होते आता त्या गावात केवळ पाच रुग्ण उपचार घेत आहेत. केवळ एका भूमिपुत्राने आयुर्वेदिक काढ्याची चळवळ राबविल्यामुळे बाधितांची संख्या खाली आल्याचे ग्रामस्थांमधून बोलले जात अहे.
मोहोळ तालुक्यातील सौंदणे येथील भूमिपुत्र, डिलिट पदवी प्राप्त विश्वानंद आयुर्वेदिक चिकित्सालयाचे डॉक्टर अनिल बनसोडे यांनी स्वत:चे गाव व परिसर कोरोना मुक्त व्हावे म्हणून रोगप्रतिकारशक्तीवर्धक कंठामृत काढ्याचे मोफत वाटप केले आहे. त्यामुळे सौंदणे गावातील नवीन रुग्णसंख्या कमी झाली आहे. मूळचे सोंदणे येथील रहिवासी असलेल्या डॉ. अनिल बनसोडे व डॉ. नीलम बनसोडे यांचे पुणे येथे विश्वानंद परिपूर्ण आयुर्वेदिक चिकित्सालय आहे. स्वत:च्या गावाकडे कोरोनाचा वाढलेला प्रादुर्भाव लक्षात येताच त्यांनी गाव गाठले.
गावात माजी सरपंच भारत सुतकर यांची भेट घेऊन गावकऱ्यात कोरोनाच्या भीतीचे सावट कमी करत त्यांनी बनविलेला कंठामृत काढा सर्व गावाला मोफत वाटप केला. याशिवाय फ्रंटलाईन वर्कर म्हणून काम करणारे पोलिसांनाही या काढ्याचे वाटप केले . या काढ्याच्या सेवनाने अनेकांची प्रतिकारशक्ती वाढली. गावात नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेला नाही. मोफत काढा वाटप करणारे डॉ. अनिल बनसोडे व डॉ. नीलम बनसोडे यांचे कौतुक होत आहे.
--
काढा वापराची पद्धत, मास्कचा वापर, फिजिकल डिस्टन्स, सॅनिटायझरचा वापर तसेच योग्य आहार , पथ्य, व्यायाम आदी गोष्टीचे नागरिकांनी पालन करण्याबाबत मार्गदर्शन केले. रोगप्रतिकारशक्ती वर्धक कंठामृत काढा हा २६ आयुर्वेदिक घटक द्रव्यापासून बनविला. तो मोफत दिला.
- डॉ. अनिल बनसोडे
---
एक महिन्यापूर्वी गाव रेडझोनमधे होते. जवळपास ७५ रुग्ण आढळून आले होते. सुमारे १३ जणांना प्राण गमवावा लागला आहे. आता रुग्ण बरे होत आहेत. केवळ ५ रुग्ण उपचार घेत आहेत. नवीन रुग्ण आढळून आले नाहीत. काढ्याचा परिणाम जाणवतो.
- भारत सुतकर
माजी सरपंच, सैंदणे