रुग्णालयात भिती नाही आगीची अन् चिंता मिटली रूग्णांसोबतच नातेवाईकांची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2022 11:37 AM2022-04-06T11:37:22+5:302022-04-06T11:37:28+5:30
काेराेनाचा परिणाम - दाेन वर्षांत २०० पेक्षा जणांनी घेतली ‘फायर एनओसी’
साेलापूर : शहरातील रुग्णालयांचा धंदा आणखी जाेरात आहे. महापालिकेच्या अग्निशामक दलाकडून दाेन वर्षांपूर्वी शे-दीडशे रुग्णालये ‘फायर एनओसी’चे नूतनीकरण करून घेत हाेते. गेली दाेन वर्षे २०० हून अधिक रुग्णालये ‘फायर एनओसी’साठी अर्ज करीत आहेत.
काेराेनामुळे रुग्णालयांच्या उत्पन्नात माेठा फरक पडला. पूर्वी तीन किंवा चार मजली इमारतीमध्ये असलेल्या रुग्णालयांचा विस्तार सुरू आहे. पालिकेच्या बांधकाम विभागात विस्तारासाठी अर्ज करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. अनेकांनी नव्या जागा घेतल्या आहेत. शहरात रुग्णालयातील बेडची संख्या वाढत असल्याचे बांधकाम विभागाचे म्हणणे आहे.
--
दाेन वर्षांत आलेल्या अर्जांची संख्या
अग्निशामक दलाचे अधीक्षक केदार आवटे यांच्या माहितीनुसार २०२०-२१ या वर्षांत २१७ रुग्णालयांकडून पालिकेचे नाहरकत प्रमाणपत्र घेतले. २०२१-२२ या वर्षात २२४ रुग्णालयांनी नाहरकत प्रमाणपत्र घेतले. २०१९ पूर्वी १५० च्या आसपास अर्ज दाखल व्हायचे.
--
या गाेष्टी असेल तरच मिळते एनओसी
रुग्णालयांकडून बांधकाम विभागाकडे अर्ज केला जाताे. केवळ तळमजल्यात सेवा सुरू असेल तर अग्निविमाेचक यंत्र आवश्यक आहे. तळमजला आणि त्यावर पहिला मजला असेल तर नळखांब, पाइप आणि माेटर बसविणे आवश्यक आहे. तीन मजलीपेक्षा अधिक उंच इमारतीमध्ये स्वंयचलित तुषार यंत्रणेसह नळखांब, पाइप व माेटर आवश्यक आहे.
-
काॅर्पाेरेट रुग्णालयांचा ट्रेंड
शहरातील देगाव राेड, हैदराबाद राेड, अक्कलकाेट राेड या भागात काॅर्पाेरेट रुग्णालयांचा ट्रेंड सुरू झाला आहे. या रुग्णालयांमध्ये बेड, आयसीयू, व्हेंटिलेटर विथ आयसीयू आणि यंत्रे अत्याधुनिक आहेत. रुग्णालये काॅर्पाेरेट झाली तरी सेवा बजावण्याची पद्धत माणुसकीला धरून असावी, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
--
शहरात रुग्णालयांची संख्या वाढत आहे. या रुग्णालयांचे फायर ऑडिट आणि इलेक्ट्रिक ऑडिट नियमित असणे आवश्यक आहे. राज्यातील काही रुग्णालयात आगीच्या घटना घडल्या. या घटना आपल्याकडे घडू नये म्हणून २० पेक्षा जास्त बेड असलेल्या रुग्णालयांची नियमित तपासणी सुरू आहे.
- केदार आवटे, अधीक्षक, अग्निशामक दल, मनपा.