हिप्परगा तलावात गणेश विसर्जन नाही; भाविकांनी काळजी घेण्याचे केले आवाहन
By Appasaheb.patil | Published: September 6, 2022 07:04 PM2022-09-06T19:04:07+5:302022-09-06T19:04:13+5:30
जिल्हाधिकारी कार्यालयात गणेश भक्त, हिप्परगा ग्रामस्थ, अधिकारी बैठकीत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे आवाहन
सोलापूर : यावर्षी गणेश उत्सव मोठ्या प्रमाणात होत आहे. ९ सप्टेंबर २०२२ रोजी अनंत चतुर्दशी असल्याने यादिवशी सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणपतीचे विसर्जन होणार आहे. हिप्परगा तलाव 104 टक्के भरला असल्याने गणेश भक्तांनी प्रशासनाच्या सुचनांचे पालन करून गणेश विसर्जन शांततेत खाणीमध्ये करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात गणेश भक्त, हिप्परगा ग्रामस्थ, अधिकारी बैठकीत शंभरकर बोलत होते. यावेळी मनपा आयुक्त पि.शिवशंकर, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, प्रांताधिकारी हेमंत निकम, पोलीस उपायुक्त डॉ. वैशाली कडूकर, जलसंपदाचे कार्यकारी अभियंता एम.टी. जाधवर, सरपंच वैशाली धुमाळ, उपसरपंच रोहन भिंगारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे, नगर अभियंता संदीप कारंजे, पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अविनाश पाटील यांच्यासह हिप्परगा ग्रामपंचायतीचे सदस्य उपस्थित होते.
शंभरकर यांनी सांगितले की, सोलापूर शहर आणि ग्रामीण भागातील गणेश भक्त हिप्परगा तलाव येथे गणेश मुर्ती आणि निर्माल्य विसर्जनासाठी येतात. तलाव 104 टक्के भरला असून सांडव्यातून पाणी जात आहे. तलावातील पाण्याचा वापर शहर आणि आजूबाजूचे लोक पिण्यासाठी, शेतीसाठी आणि जनावरांसाठी केला जातो. गणेश मुर्ती, निर्माल्याचे विसर्जन केल्यास तलावातील पाणी प्रदूषित होईल. शिवाय यापूर्वी तलावात बुडून अनेक व्यक्तींचा मृत्यू झाल्याने विसर्जनाची सोय तलावाच्या बाजूला असलेल्या खाणीमध्ये करण्यात आली आहे. प्रशासनाकडून गणेश विसर्जन खाणीमध्ये करताना पावित्र्य अबाधित ठेवले जाणार आहे.
मनपा, पोलीस प्रशासन, पाटबंधारे विभाग, जलसंपदा यांनी विविध सार्वजनिक गणेश मंडळांना विश्वासात घेऊन त्यांना सूचनांची माहिती द्यावी. हिप्परगा तलावाकडे जाणारे रस्ते, विसर्जन करण्यात येणाऱ्या खाणीकडे जाणारे रस्ते याबाबत जलसंपदा विभागाने पोलीस आणि महापालिका यांच्याशी समन्वय ठेवून दिशादर्शक फलक, सूचना फलक जागोजागी लावावेत, असेही शंभरकर यांनी सांगितले.
पोलीस विभागाने गणेश भक्त आणि नागरिकांच्या सोयीसाठी हिप्परगा तलावाकडे जाणाऱ्या मार्गावर बॅरेगेटस लावण्यात येणार आहेत. 8 सप्टेंबरला सकाळी 10 वाजलेपासून 70 फुट रस्ता, शिवलक्ष्मी मंदिर, तुळजापूर रोडचा बोगदा येथे बॅरेगेटस लावण्यात येणार आहेत. चार चाकी वाहनाला याठिकाणी प्रवेश नसणार आहे. सोलापूर शहरातील सार्वजनिक गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी हिप्परगा तलावात गणेश मुर्तींचे विसर्जन न करता खाणीमध्ये करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन श्री. शंभरकर यांनी केले आहे.
सोलापूर शहरात सार्वजनिक गणेश मंडळे 38 असून सर्व मंडळांनी आपल्या गणेश भक्तांना काळजी घेण्याच्या सूचना द्याव्यात. गणपती विसर्जन शांततेत आणि वेळेत करावे. या उत्सवाला कोणतेही गालबोट न लागता करण्याचे आवाहन त्यांनी केले.
सोलापूर शहरात गणेश विसर्जन करण्यात येणारी ठिकाणे