राज्यात आरक्षणाची गरज नाही, व्यवस्थित पैशांचे नियाेजन केले पाहिजे : राज ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2024 05:31 AM2024-08-06T05:31:35+5:302024-08-06T05:32:33+5:30
विधानसभेसाठी पंढरपूर, शिवडीची उमेदवारी जाहीर
साेलापूर : महाराष्ट्रात सगळ्या गाेष्टी मुबलक प्रमाणात आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात आरक्षणाची गरज नाही. व्यवस्थित पैशांचे नियाेजन केले पाहिजे, अशी भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी साेमवारी मांडली.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची शासकीय विश्रामगृहात बैठक घेतली. पत्रकार परिषदेत ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रात बाहेरच्या राज्यातील मुले येतात आणि आपल्या नाेकऱ्या बळकावतात. भूमिपुत्रांना चांगल्या नाेकऱ्या मिळायला हव्या. खासगी संस्थांमध्ये किती मुलांना आरक्षण मिळेल, हे लक्षात घ्यावे. माथी भडकावण्यासाठी हे सर्व सुरू आहे. प्रत्येक समाजाने हे समजून घ्यावे. आपल्या राज्याचा सर्वाधिक पैसा बाहेरून येणाऱ्यांसाठी खर्च हाेताेय. यावेळी मनसेकडून शिवडीतून बाळा नांदगावकर आणि पंढरपूरमधून दिलीप धोत्रे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली.
हे पवारांना हवंय का?
महाराष्ट्राची परिस्थिती मणिपूर हाेऊ नये, असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले हाेते. यावर ठाकरे म्हणाले, महाराष्ट्राचा मणिपूर हाेण्यात शरद पवार यांनी याला हातभार लावला. महाराष्ट्राचा मणिपूर हाेऊ नये, याची काळजी पवार यांनी घेतली पाहिजे. त्यांना हवंय की नकाेय हे कळलं पाहिजे, असे ठाकरे म्हणाले.
माथी भडकावणारी वक्तव्ये करू नका : अशोक चव्हाण
नांदेड : गरीब, उपेक्षितांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकारने आरक्षण दिले आहे. त्यामुळे कुणीही माथी भडकावणारी वक्तव्ये करू नयेत, अशा शब्दांत खासदार अशोक चव्हाण यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. खासदार चव्हाण म्हणाले, राज ठाकरे यांच्या पक्षाची भूमिका वेगळी असू शकते; परंतु देशात आरक्षण टिकले पाहिजे, अशी भाजपची भूमिका आहे. कुणीही माथी भडकविण्याचे काम करू नये. सामाजिक सलोखा कायम राहिला पाहिजे.
राज ठाकरे यांच्यावर कारवाई करा : आंबेडकर
अमरावती : राज ठाकरे यांना सरकारने मागे-पुढे न बघता आतमध्ये टाकले पाहिजे, असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी अमरावतीत केले. राज ठाकरे यांचे वक्तव्य समाज दुभंगण्याचे वक्तव्य आहे. समाज दुभंगला की देश दुभंगतो. त्यामुळे यूएपीए आणि राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी आंबेडकर यांनी केली.