बागल गटाच्या रक्तात कदापिही गद्दारी नाही : रश्मी बागल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 10:43 AM2019-03-27T10:43:32+5:302019-03-27T10:46:29+5:30
बागल गटाच्या वतीने करमाळ्यात राष्टÑवादी काँग्रेसचा मेळावा घेण्यात आला.
करमाळा : तालुक्यात दोन्ही गटात पक्षासाठी समन्वयाची भूमिका आवश्यक आहे. गद्दारी ही बागल गटाच्या रक्तात नाही. प्रत्येक गावात जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महत्त्व पटवून देत संजयमामा शिंदे यांचा प्रचार करणार आहेत. याआधी आपले मतभेद होते, पण पक्षासाठी एकत्र येऊन आपण शिंदे यांचे काम करणार असल्याचे बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल यांनी सांगितले.
बागल गटाच्या वतीने करमाळ्यात राष्टÑवादी काँग्रेसचा मेळावा घेण्यात आला. या बैठकीत त्या बोलत होत्या. रश्मी बागल म्हणाल्या, माढा लोकसभेसाठी संजय शिंदे यांचे नाव जाहीर करण्यापूर्वी शरद पवार यांनी बागल गटाला विश्वासात घेतले होते. मागच्या विधानसभा निवडणुकीत विरोधात लढलो असलो तरी यावेळी आपण प्रामाणिकपणे त्यांच्यासोबत आहोत.
सध्या भाजप-शिवसेना सत्तेच्या विरोधात तीव्र नाराजी आहे. लोकांना आता परिवर्तन हवे आहे. हेच परिवर्तन निवडणुकीत विजयासाठी उपयोगी होईल. विरोधकांच्या कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका. जनतेत संभ्रम निर्माण करण्याचे काम करणाºयांना त्यांची जागा दाखवून शिंदे यांना बहुमताने विजयी करा, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवानेते दिग्विजय बागल, ज्येष्ठ नेते विलासराव घुमरे, बाजार समितीचे उपसभापती चिंतामणी जगताप, तालुकाध्यक्ष सतीश नीळ, शहराध्यक्ष अल्ताफ तांबोळी, बाळासाहेब पांढरे, महिला अध्यक्ष साधना खरात, प्रिया ठोंबरे, दत्ता गवळी, झेडपी सदस्य राणीताई वारे, युवराज रोकडे, विजय भगत यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन रणजित शिंदे यांनी केले.
नाराजांची समजूत...
संजयमामा शिंदे यांच्या विरोधात माढा तालुक्यातील ३६ गावांतून बागल गटात असलेले दत्ता गवळी, विजय भगत यांच्यासह अन्य कार्यकर्ते यांची संजयमामांविषयी असलेली नाराजी दूर करण्यासाठी रश्मी बागल यांनी बंद खोलीत तासभर नाराजांची समजूत काढली.