एकही हॉलमार्क सेंटर नाही, सोन्याची गुणवत्ता तपासणे अवघड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:26 AM2021-08-27T04:26:00+5:302021-08-27T04:26:00+5:30
एचयूआयडी या पोटनियमात सोने-चांदीच्या प्रत्येक वस्तूवर बरेच कोड नंबर येणार आहेत. त्यासाठी पोर्टलवर आगाऊ नोंदणी करणे, वस्तूचे वजन, वर्णन, ...
एचयूआयडी या पोटनियमात सोने-चांदीच्या प्रत्येक वस्तूवर बरेच कोड नंबर येणार आहेत. त्यासाठी पोर्टलवर आगाऊ नोंदणी करणे, वस्तूचे वजन, वर्णन, संख्या इत्यादी गोष्टीची माहिती द्यावी लागते. त्यानंतर आठ दिवसांनंतर तो स्टॉक संबंधित दुकानदाराला मिळणार आहे. यासाठी १५ दिवसांपेक्षा जास्त वेळ लागणार आहे.
दागिने विक्रीसाठी मोठी अडचण निर्माण होणार आहे. ग्रामीण भागात मुळात हॉलमार्क सेंटरची संख्या कमी आहेत. मंगळवेढा तालुक्यात एकही हॉलमार्क सेंटर नाही, मग दागिने विकणार कसे? दागिने हॉलमार्कच पाहिजेत हे मान्यच आहे; पण एचयूआयडीसहित दागिने विकणे अशक्य आहे. तालुका गावपातळीवर तर हॉलमार्क सेंटर नाहीत त्यांनी कसे करायचे, असा सवाल उपस्थित होत आहे.
..........
भुर्दंड ग्राहकांनाच
लग्नकार्य, अर्जंट ऑर्डरचे काम तत्काळ होऊच शकणार नाही. या सगळ्याची पूर्तता करताना किमान २ उच्च पदवीधर आणि आलेला माल तपासणी करण्यासाठी तीन ते चार मदतनीस लागणार आहेत. परत हॉलमार्किंगमधील एचयूआयडीमुळे त्याची फी ग्राहकांना भरावी लागणार याचा भुर्दंड ग्राहकांनाच बसणार आहे.
..........
ग्राहकाला शुद्ध सोने मिळावे, ही भावना आहे. नव्याने लागू केलेली एचयूआयडी ही अत्यंत किचकट प्रक्रिया आहे. या कायद्याने सराफ व सुवर्णकारांना दिवसभर दुकानातील कामाव्यतिरिक्त कारकुनी कामाचा ताण वाढणार आहे. याशिवाय या अंतर्गत सोने मिळण्यासाठी उशीर लागणार आहे, त्याचा फटका ग्रामीण भागातील छोट्या व्यावसायिकांना बसणार आहे.
- रावसाहेब चव्हाण-पाटील, सराफ व्यापारी
----