कोरोना लसीचा तुटवडा नाही, मनुष्यबळ कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:22 AM2021-04-09T04:22:57+5:302021-04-09T04:22:57+5:30
मोहोळ : ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत सुरू केलेल्या प्रतिबंधात्मक लसीकरणाला सुरुवातीला प्रतिसाद मिळाला नाही. परंतु, आता ...
मोहोळ : ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत सुरू केलेल्या प्रतिबंधात्मक लसीकरणाला सुरुवातीला प्रतिसाद मिळाला नाही. परंतु, आता शहरातील ग्रामीण रुग्णालयासह तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रावर या लसीकरणाला उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
आतापर्यंत ग्रामीण रुग्णालयात चार हजार तर ७ प्राथमिक आरोग्य केंद्रातून ४,०७३ अशा एकूण ८,०७३ नागरिकांना ही लस देण्यात आली आहे. तालुक्यात कुठेही लसीकरणाचा तुटवडा नसल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ़. प्रल्हाद गायकवाड व तालुका वैद्यकीय अधिकारी अरुण पाथरुडकर यांनी दिली. सुरुवातीच्या काळात लस उपलब्ध होऊनही भीतीपोटी त्याला प्रतिसाद कमी होता, परंतु आता शहरासह ग्रामीण भागामध्ये ही लस घेण्यासाठी पुरुष व महिला उस्फूर्तपणे येत आहेत.
शहरातील ग्रामीण रुग्णालयात आजतागायत चार हजार नागरिकांना लस देण्यात आली. ही लस देताना प्रारंभी कोरोनाची रॅपिड टेस्ट करुन रक्तदाब, साखरेची तपासणी करुनच लस दिली जाते. शहराबरोबरच तालुक्यातील अनगर प्राथमिक आरोग्य केंद्रात एक हजार, अंकोली केंद्रात ५०१ , बेगमपूर केंद्रात ४७९, कामती केंद्रात ६०३, कुरुल केंद्रात ५०५, नरखेड केंद्रात ३३३, पाटकुल केंद्रात ६४९ अशा ७ केंद्रांतून आजपर्यंत ४,०७३ नागरिकांनाही लस देण्यात आली आहे. तालुक्यात एकूण ८०७३ जणांना लस देण्यात आली आहे.
या लसीकरणासाठी ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ़. प्रल्हाद गायकवाड, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण पात्रूडकर, शिरापूर केंद्राचे डॉ. वाय. जे. जगताप, अनगर केंद्राचे डॉ. एस .एस मुल्ला, अंकोली केंद्राचे डॉक्टर विनोद अभिवंता, बेगमपूर केंद्राचे डॉ. ए. डी. शिवशरण, कामती केंद्राचे डॉक्टर एम. एम. हरकुड, कुरुल केंद्राचे डॉ. धनंजय घाटुळे, नरखेड केंद्राचे डॉ. किरण बंडगर, पाटकुल केंद्राचे डॉ. हिंदुराव काळे, आरोग्य सहाय्यक दादाराव बोराडे यांच्यासह डॉ. जिलानी खान, आर. आर. खान, एस. पी. भगत, एन. एस. गोरवे यांच्यासह ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी परिश्रम घेत आहेत.
मनुष्यबळाची अडचण
सद्यस्थितीत ग्रामीण रुग्णालयांमध्ये लस उपलब्ध असून, तुटवडा जाणवत नाही. दररोज १०० जणांना लस देण्यात येत आहे. मनुष्यबळ कमी असल्याने अडचणी येतात, अशी माहिती ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. गायकवाड यांनी दिली.
फोटो
०८ मोहोळ ०१
मोहोळच्या ग्रामीण रुग्णालयात लसीकरणासाठी झालेली गर्दी.