प्रदर्शनापूर्वी चित्रपटाचा वाद निर्माण करणे हा ट्रेंड नाही - मधूर भांडारकर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2018 04:33 PM2018-02-17T16:33:50+5:302018-02-17T16:34:43+5:30
वाद निर्माण करणे हा आपला ट्रेंड नसून वास्तव मांडण्याचा आपला प्रयत्न असतो असं दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी स्पष्ट केलं आहे
सोलापूर - एखादा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच त्यावरून वाद निर्माण करायचा आणि त्यावर चर्चा घडवायची असा ट्रेंड असल्याची टीका होत असते. असे वाद निर्माण करणे हा आपला ट्रेंड नसून वास्तव मांडण्याचा आपला प्रयत्न असतो. मात्र त्या वास्तवाला आव्हान देण्याचा प्रयत्न झाला की वादाची परिस्थिती निर्माण होते, असे प्रतिपादन चित्रपट दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी केले.
प्रिसिजनच्या वतीने सोलापुरात आयोजित दुस-या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी आले असता पत्रकारांशी झालेल्या वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले, वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांसाठी समाजात अनेक विषय आहेत. मात्र त्यांचा शोध घ्यावा लागतो. चांदणी बार, इंदू सरकार, पेज थ्री, हिरोइन यासारखे विषय अशा घटनांमधूनच आलेले आहेत. समाजातील सत्यता दाखविण्यासाठी मी जोखीम घेतो. म्हणूनच माझे चित्रपट आरसा असतात, त्यामुळे प्रतिबिंबित होणारा विषय संबंधितांना अडचणीचा ठरतो.
इंदू सरकारवर झालेल्या टीकेचा उल्लेख करून ते म्हणाले, या चित्रपटात आपण आणीबाणी दाखविली. प्रत्यक्षात अनेक पुस्तकांमधून, वृत्तपत्रातून या विषयावर लिहून आले आहे. त्यावर डॉक्युमेंट्री निघाल्या आहेत. मी तोच विषय चित्रपटातून मांडला असता बराच विरोध झाला. काँग्रेसकडून फोन आले. धमक्या मिळाल्या. अन्यत्र लिहून आले असताना चित्रपटालाच विरोध का ?
असे प्रसंग आले की बदल करावे लागतात. चित्रपटाच्या नावात,गाण्यातील शब्दात बदल करून प्रसंगी चित्रपटातही बदल करावे लागतात. त्यामुळे मुळ कलाकृती हरविण्यचा धोका असतो, याची खंत त्यांनी व्यक्त केली.
आपली कलाकृती जीवंत असावी असा आपला नेहमीच प्रयत्न असतो. आयुष्यात कधीही कॅमेºयासमोर न आलेली माणसे माझ्या चित्रपटात असतात. मी थेट फुटपाथवरची माणसे कॅमेºयासमोर उभी करतो, त्यामुळे आपली कलाकृती जीवंत वाटते. डायरेक्टर हा कलावंताला त्याच्या नजरेतून बघत असतो. सोलापुरातील अतुल कुलकर्णी याला चित्रपटात भूमिका देताना माझ्या डोळ्यासमोर अचानकपणे पोतया सावंत आला. हाच आपल्या चित्रपटातील पोतया सावंत असे ठरवून त्याच्यात तो ऊतरविला.
नव्या कलावंतांना संदेश देताना ते म्हणाले, या क्षेत्रात संघर्ष भरपूर आहे. त्याची तयारी ठेवायला हवी. अनेक नवनवे चेहरे येतात आणि नंतरच्या काळात गायबही होतात. ते जातात कुठे, याचा शोध या क्षेत्रात येऊ पहाणाºया पिढीने घ्यायला हवा. नव्या कलावंतांनी स्थिर राहावे, आधी त्यांनी आपल्या पदवीच्या शिक्षणावर भर द्यावा, त्यानंतरच या क्षेत्रातील करिअरचा विचार करावा, असा सल्ला त्यांनी दिला. यावेळी प्रा. समर नखाते, मनोज भागवत, प्रिसीजन फाऊंडेशनच्या अध्यक्ष डॉ. सुहासिनी शहा प्रामुख्याने उपस्थित होते.