कामही नाही अन् दामही नाही; पोलिसांच्या मदतीला येणाऱ्या होमगार्डवर संकट
By Solapurhyperlocal | Published: February 18, 2021 04:39 PM2021-02-18T16:39:46+5:302021-02-18T16:39:52+5:30
तीन महिन्यांपासून होमगार्डचे मानधन थकीत; बेरोजगारीला वैतागले महिला-पुरुष मंडळी
संताजी शिंदे
सोलापूर : पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून काम करणार्या होमगार्डचे गेल्या तीन महिन्यांपासूनचे मानधन थकीत राहिले आहे. सध्या काम बंद ठेवण्यात आले असून, बेरोजगारीला वैतागलेल्या महिला-पुरुष मंडळींसमोर कोणताही पर्याय राहिला नाही.
वर्षभरातील विविध सण, उत्सव, निवडणुका, मोर्चे, आंदोलने, आदी कामांसाठी पोलिसांचा बंदोबस्त सातत्याने ठेवावा लागतो. पोलिसांचं मनुष्यबळ लक्षात घेता त्यांच्या मदतीला गृह विभागाच्या वतीने होमगार्डची नियुक्ती केली जाते. असे होमगार्ड शहर व जिल्ह्यात दोन्हीकडे पोलिसांच्या मदतीला लावले जातात. पोलिसांची ड्युटी जितक्या वेळेची असते, तेवढाच बंदोबस्त होमगार्डला दिला जातो. कोरोनाच्या काळात गेल्या नऊ महिन्यांमध्ये सातत्याने होमगार्डना बंदोबस्त देण्यात आला होता. मात्र, नोव्हेंबर-डिसेंबर २०२० व जानेवारी २०२१ या कालावधीत पूर्णवेळ होमगार्डनी काम केले, मात्र त्यांचे मानधन अद्याप मिळालेले नाही.
एक महिना सतत ड्युटी केल्यानंतर एका होमगार्डला दर दिवशी ६७० रुपयाप्रमाणे २० हजार १०० रुपयांपर्यंतचे मानधन मिळते. या होमगार्डना २०१९ मधील ६ डिसेंबरनिमित्त लावलेल्या पाच दिवसांची, तर २०२० मधील संक्रांतीच्या सहा दिवसांच्या बंदोबस्ताचे मानधन अद्याप मिळाले नाही. बहुतांश होमगार्ड हे फक्त ड्युटीवर अवलंबून आहेत. काही होमगार्ड रिक्षा चालवतात, सायकल दुकान चालवतात, मजुरी करतात. मिळेल ते काम करून आपलं पोट भरण्याचा प्रयत्न करतात. मानधन जरी थकीत असले तरी काम करण्याचा उत्साह होमगार्डमधून कायम दिसून येतो. तीन महिन्यांचे मानधन थकीत असले तरीही होमगार्डनी फेब्रुवारी महिन्यामध्ये स्वतःहून बंदोबस्त मागितला होता. मात्र, मागील थकीत बाकी असल्यामुळे संबंधित होमगार्ड अधिकाऱ्यांनी फेब्रुवारी महिन्यामध्ये त्यांना बंदोबस्त दिला नाही.
पूर्वी वर्षातून मिळायचे सहा महिने काम!
- वास्तविक पाहता होमगार्डना यापूर्वी असलेल्या सरकारच्या काळात वर्षातून किमान सहा महिन्यांचा बंदोबस्त मिळत होता. सध्याच्या सरकारने सहा महिन्यांचा बंदोबस्त बंद केला आहे. केवळ सण-उत्सव, निवडणुका यापुरतेच बंदोबस्त दिले जात आहेत. कोरोनाच्या काळात मात्र नियमित बंदोबस्त दिला गेला होता. आता मात्र यापुढे बंदोबस्त मिळणार की नाही याची चिंता सर्व होमगार्डना लागली आहे.
अनुदान आले की तत्काळ वाटप केले जाईल : अतुल झेंडे
महाराष्ट्र शासनाकडून ऑक्टोबर २०२० पर्यंतचे अनुदान प्राप्त झाले होते. आलेले अनुदान वाटप करण्यात आले आहे. नोव्हेंबर-डिसेंबर २०२० व जानेवारी २०२१ या कालावधीतील अनुदान अद्याप प्राप्त झाले नाही. पुढील १५ दिवसांत ते प्राप्त होईल. मार्चअखेर मानधन वाटप केले जाईल, अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
- जिल्ह्यात होमगार्डची संख्या - २६००
- तीन महिन्यांचे थकीत मानधन - १५ कोटी ६० लाख रुपये.