प्रपंचात राहून परमार्थ करण्याची इच्छा असावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:29 PM2021-04-02T16:29:24+5:302021-04-02T16:48:09+5:30
सिद्धवचन - आचार
ज्याचा हा आचार | ऐका हो बोम्मय्या | साकार मल्लय्या | तोचि असे ||
प्रपंचात राहून परमार्थ करण्याची इच्छा असावी. अशी इच्छा निर्माण झाल्यास परधन आणि परस्त्रियांचा त्याग करावा. प्रपंचात राहून कीर्ती मिळविण्याची एखाद्याची अपेक्षा असते. त्याने प्राणिमात्रावर दया करावी. निरर्थक भाषेचा त्याग करावा. याचकांना दान करावे. परशिवाची पूजा या पद्धतीने करावी. हे आचरण म्हणजे अंतरंगातील सुविचार आणि बहिरंगाचे भूषण होय. हे बोम्मय्या अशा प्रकारचे आचरण करणाराच परब्रम्हस्वरूपी कपिलसिद्ध मल्लिकार्जुन आहे हे तुम्ही समजून घ्या.
कपिलसिद्ध मल्लिकार्जुनाला कसे ओळखायचे याचे विवेचन शिवयोगी सिद्धरामेश्वरांनी केले आहे. याविषयी लक्ष्मण महाराज म्हणतात, ' परस्त्री माता परद्रव्य वमन | परपीडा नेणे तोचि साधू || ७१७.१ || ते पुढे म्हणतात, ' लक्ष्मण म्हणे बाह्य हो सोंगाने | नव्हे भगवान तृप्त बापा || ७१७.५ || कपिलसिद्ध मल्लिकार्जुन आपल्या आजूबाजूला विविध रुपात आहे. त्यांना ओळखण्याची पात्रता आपली असावी लागते. जगद्गुरू तुकोबाराय म्हणतात, ' परद्रव्य परनारी | याचा धरी विटाळ || २८४.२ || असे वागणाऱ्यांविषयी ते म्हणतात, ' तुका म्हणे ते शरीर | घर भांडार देवाचें || २८४.४ || हे सज्जन प्रसिद्धीच्या झोतात येत नाहीत.
मल्लय्या आहेच | आपल्या जवळी |
दुर्गुण जो जाळी | तोची असे || १ ||
परद्रव्य टाळी | परनारी सोडी |
सत्कर्मासी जोडी | मल्लय्या तो || २ ||
सिद्धदास म्हणे | सिद्धाचे वचन |
करी आचरण | मल्लय्या तो || ३ ||
- डॉ. अनिल काशीनाथ सर्जे, सोलापूर