दुकानावरच पोट आहे, काय कारवाई करायचीय ती करा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:23 AM2021-04-07T04:23:13+5:302021-04-07T04:23:13+5:30
मोहोळ : आयुष्यभर पोलीस, पुढारी व लोकांच्या घरोघरी भीक मागून दमलो. पोलीस स्टेशनच्या चकरा मारून पाय थकले. आता कुठे ...
मोहोळ : आयुष्यभर पोलीस, पुढारी व लोकांच्या घरोघरी भीक मागून दमलो. पोलीस स्टेशनच्या चकरा मारून पाय थकले. आता कुठे तर रोजीरोटीसाठी छोटासा स्टेशनरीचा उद्योग चालू केलाय, त्याच्यावरच माझ्या परिवाराचं पोट आहे. त्यामुळे मी आता दुकान बंद करू शकत नाही. तुम्हाला माझ्यावर काय कारवाई करायची आहे, ती करा, अशी व्यथा अपंग व्यावसायिक गोपीनाथ पवार यांनी पोलिसांसमोर व्यक्त केली.
राज्यासह सोलापूर जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ पाहता सोलापूर जिल्ह्यामध्ये ३० एप्रिलपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याने शहरातील व्यापाऱ्यांसह ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांची संभ्रमावस्था झाली. अनेकांची यामुळे अडचण निर्माण झाली. या अचानक केलेल्या बंदमुळे मोहोळ शहरातील व्यापारीवर्गामध्ये नाराजीचा सूर उमटला.
अचानक केलेल्या बंदमुळे ग्रामीण भागातून ऐन उन्हाळ्यात खरेदीसाठी आलेल्या लोकांना पिण्यासाठी पाणीही मिळाले नाही. त्यामुळे बाहेर जाऊन आलेल्या लोकांची तारांबळ उडाली.
----
अधिक निर्बंध लादून किमान सहा तास दुकाने सुरु ठेवा
एक वर्षापासून व्यापाऱ्यांचे अर्थचक्र कोरोनात रूतले आहे. त्यातून व्यापारी अद्याप सावरला नाही. तोच आता एकदम एक महिना व्यापार बंद ठेवण्याचा निर्णय रोजीरोटीवर गदा आणणारा आहे. कोरोनाचे संकटसुद्धा भयावह आहे. हे जनतेला व व्यापारी बांधवांनाही माहीत आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांचे नुकसान न होता यातून मार्ग काढायला हवा. आता आहेत त्यापेक्षा जास्त निर्बंध घालून दररोज किमान सहा तास तरी दुकाने उघडायला परवानगी द्यायला हवी, अशी मागणी चेंबर ऑफ कॉमर्सचे मोहोळचे अध्यक्ष प्रवीण डोके यांनी केली आहे.
०६ प्रवीण डोके